Breaking
Updated: ऑगस्ट 14, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड : शेगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग (५४८ सी) मधील परतूर-कळंब टप्प्यातील अपूर्ण रस्ता, सुमार दर्जाचे बांधकाम, जोडरस्त्यांचा अभाव आणि अडथळ्यांमुळे थांबलेली कामे याबाबत बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याचे आणि दर्जा मानकांनुसार सुनिश्चित करण्याचे आश्वासन दिले.
गडकरी यांनी सांगितले की, या महामार्गाचा एकूण ७२० किमीपैकी ७०८ किमी रस्ता पूर्ण झाला आहे. उर्वरित १२ किमीचे काम विविध टप्प्यांत असून २०२७-२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. परतूर-माजलगाव (किमी ५१ ते १०१) टप्पा २०१७ मध्ये सुरू होऊन जुलै २०१९ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र वाद, जमिनीचे अधिग्रहण आणि इतर अडचणींमुळे सहा वर्षे रखडले. माजलगाव तालुक्यातील सादोळा गावाजवळील ६०० मीटर रस्ता स्थानिक विरोधामुळे अपूर्ण आहे, तो तातडीने पूर्ण केला जाईल.
माजलगाव-केज आणि केज-कळंब टप्प्यांसाठी ९३८.३५ कोटी रुपये मंजूर झाले असून आतापर्यंत ६९० कोटी रुपये खर्च झाले आहेत. हे उर्वरित काम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तसेच धारूर घाटातील पर्यायी मार्ग आणि बर्दापूर-लोखंडी सावरगाव दुहेरीकरणाचे काम नियोजित वेळेत व मानकानुसार पूर्ण केले जाईल.
अपूर्ण रस्त्यांमुळे झालेल्या अपघातांबाबत गडकरी यांनी सांगितले की, वेगाने वाहन चालवणे आणि हेल्मेट न वापरणे हे कारणीभूत ठरले आहे. अशा पीडितांना हिट अँड रन मोटार अपघात पीडित योजना २०२२ अंतर्गत भरपाई दिली जात आहे. सर्व प्रकल्पांची गुणवत्ता काटेकोर तपासली जाईल आणि मानकापेक्षा कमी दर्जाचे काम पुनर्निर्माण करण्याची जबाबदारी सरकारचीच असेल.