Breaking
Updated: एप्रिल 10, 2026
आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज: तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली असून, या भीषण प्रकारानंतर पीडितेने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सध्या या पीडित मुलीची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून तिच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तालुक्यातील एका गावात दोन तरुणांनी पीडित अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार केला. या धक्कादायक घटनेमुळे मानसिक धक्क्यात असलेल्या पीडितेने राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. मुलीची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात हलवले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे. या घटनेने पीडितेच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पीडितेच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून केज ग्रामीण पोलिसांनी तातडीने दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत एका आरोपीला ताब्यात घेतले असून त्याचा दुसरा साथीदार अद्याप फरार आहे. फरार आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली असून परिसरातील संशयित ठिकाणांवर छापेमारी सुरू आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी बीड येथील ‘पिंक पथका’ला पाचारण करण्यात आले असून त्यांनी तपासाची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत.
या हृदयद्रावक घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून दोषींना कठोरत-कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. गावात निर्माण झालेला तणाव पाहता पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला असून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाकडून पीडितेच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत आणि धीर देण्याचे प्रयत्न सुरू असून पोलीस तांत्रिक आणि वैद्यकीय पुराव्यांच्या आधारे न्यायालयात सबळ बाजू मांडण्यासाठी तयारी करत आहेत.