Breaking

दीनदयाल शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्र अंबाजोगाई येथे ‘किसान सन्मान दिन’ उत्साहात साजरा

Updated: डिसेंबर 23, 2025

By Vivek Sindhu

दीनदयाल शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्र अंबाजोगाई येथे ‘किसान सन्मान दिन’ उत्साहात साजरा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई : दीनदयाल शोध संस्थान, कृषि विज्ञान केंद्र अंबाजोगाई यांच्या माध्यमातून ‘किसान सन्मान दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांची जयंती संपूर्ण देशभरात राष्ट्रीय किसान दिवस किंवा किसान सन्मान दिन म्हणून साजरी केली जाते. याच अनुषंगाने आयोजित या कार्यक्रमास कृषी व ग्रामीण विकास क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
मंचावर नरेंद्र जोशी (शास्त्रज्ञ, उद्यानविद्या), प्रसाद चिक्षे (जलसंवर्धन कार्यकर्ते, अंबाजोगाई), आत्मा प्रकल्प उपसंचालक सुरज पाटील तसेच कृषीविद्या शास्त्रज्ञ कृष्णा कर्डिले उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी विस्तार शास्त्रज्ञ सुहास पंके यांनी केले. त्यांनी चौधरी चरण सिंह यांच्या १२३व्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या चौधरी चरण सिंह यांनी जमीनदारी निर्मूलन कायदा व जमीन धारणा कायदा यांची पायाभरणी करून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी दिली. “जोपर्यंत शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढत नाही तोपर्यंत देशाचा औद्योगिक विकास होऊ शकत नाही,” हे त्यांचे विचार आजही तितकेच समर्पक असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी केंद्र शासनाच्या ‘विकसित भारत – गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन (ग्रामीण) विधेयक २०२५’ बाबत सविस्तर माहिती देण्यात आली. या विधेयकाचा उद्देश केवळ मजुरी देणे नसून २०४७ च्या ‘विकसित भारत’ संकल्पनेशी रोजगार हमीला जोडणे हा आहे. ग्रामीण भागात पायाभूत सुविधा निर्माण करणे, १२५ दिवसांची रोजगार हमी, शेतीपूरक व्यवसायाशी निगडित कामांना प्राधान्य, पूर्णतः डिजिटल मॉनिटरिंग, जिओ-टॅगिंग व थेट लाभ हस्तांतरण यांचा समावेश आहे. शेतीच्या पेरणी व काढणीच्या हंगामात मजुरांची कमतरता भासू नये यासाठी कामांचे वेळापत्रक शेतकऱ्यांच्या गरजांशी जुळवून घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
मान्यवरांच्या हस्ते ‘विकसित भारत – जी राम जी विधेयक’ विषयक माहितीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच जल पुनर्भरण व जलसंधारण, संरक्षित सिंचन, मल्चिंग आधारित शेती, कृषी तंत्रज्ञान अवलंब, केळी व भाजीपाला उत्पादन-विक्री व्यवस्थापन, बीज उत्पादन, हवामान अनुकूल शेती, रेशीम शेती, कृषीधारित प्रक्रिया उद्योग, सेंद्रिय शेती व परंपरागत निविष्ठा निर्मिती अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १४ प्रगतशील महिला व पुरुष शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
मार्गदर्शन करताना प्रसाद चिक्षे यांनी जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित केले. मराठवाड्यात नदी प्रणाली विरळ असल्याने नैसर्गिक पाण्याची उपलब्धता कमी असून मूलस्थानी जलसंधारण कामांमुळे भूजल पातळी वाढविणे शेतकऱ्यांच्या हातात असल्याचे त्यांनी सांगितले. “शेतात पाणी आले की घरात लक्ष्मी येते,” असे ते म्हणाले. आत्मा प्रकल्पाचे उपसंचालक सुरज पाटील यांनी आत्मा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.
ऑनलाइन माध्यमातून मार्गदर्शन करताना केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ‘विकसित भारत – जी राम जी विधेयक’ ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमातून शेतकऱ्यांच्या सन्मानासोबतच त्यांच्या प्रश्नांवर चिंतन व भविष्यातील संधींबाबत सकारात्मक संदेश देण्यात आला.


Related Posts :

Categories

Recent Posts