Breaking

मौजे कान्नापूर खून प्रकरणातील ९ आरोपींचा जामीन मंजूर

Updated: जुलै 26, 2025

By Vivek Sindhu

मौजे कान्नापूर खून प्रकरणातील ९ आरोपींचा जामीन मंजूर

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई : धारुर तालुक्यातील मौजे कान्नापूर येथील स्वप्नील उर्फ बबल्या देशमुख यांच्या खूनप्रकरणात अटकपूर्व व नियमित असे एकूण ९ आरोपींचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. आरोपींच्या वतीने अ‍ॅड. अशोक कवडे यांनी काम पाहिले.

अधिक माहिती अशी की, फिर्यादी रामकिसन आत्माराम देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक ३० मार्च २०२५ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास स्वप्नील देशमुख शेतात एकटे असताना जुन्या भांडणाच्या रागातून आरोपी संतोष अशोक देशमुख व इतरांनी त्यांच्या डोक्यात कापूस काढण्याच्या चिमट्याने व दगडाने मारहाण करून खून केला होता. या प्रकरणाची नोंद सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८३/२०२५ कलम १०३(१), १८९(४), १९०, १९१(३), १३५ भारतीय न्याय संहिता अंतर्गत करण्यात आली होती.

या गुन्ह्यात पोलिसांनी संतोष अशोक देशमुखसह चार आरोपींना अटक केली होती. प्रकरणाचा तपास पूर्ण करून तपासी अधिकाऱ्यांनी केज जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असून त्यावर सत्र खटला क्रमांक ३१/२०२५ सुरू करण्यात आला आहे.

दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर आरोपी रामभाऊ देशमुख, सोनाली देशमुख, श्याम देशमुख आणि अनिल वारकरी यांनी नियमित जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. याशिवाय अन्य पाच आरोपींनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज सादर केला.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालय, केजचे न्यायमूर्ती श्री. भाजीपाले यांनी दिनांक २३ जुलै २०२५ रोजी सर्व आरोपींच्या जामीन अर्जास मंजुरी दिली.

या खटल्यात आरोपींच्या वतीने अ‍ॅड. अशोक कवडे यांनी काम पाहिले. त्यांना अ‍ॅड. डी.डी. गंगणे, अ‍ॅड. आर.एस. सापते, अ‍ॅड. एल.व्ही. गायकवाड, अ‍ॅड. आर.आर. लोंढाळ, अ‍ॅड. ए.एस. साखरे, अ‍ॅड. एस.एस. देशमुख, अ‍ॅड. एस.एस. कन्नडकर व अ‍ॅड. ए.एस. दोडके यांनी सहकार्य केले.


Related Posts :

Categories

Recent Posts