Breaking
Updated: मे 4, 2026
दारूसाठी पैसे नाकारल्याने ५४ वर्षीय शेतकऱ्यावर लोखंडी गजाने जीवघेणा हल्ला; पुस येथील घटना
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: तालुक्यातील पुस येथे दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिला म्हणून एका तरुणाने ५४ वर्षीय शेतकऱ्यावर लोखंडी गजाने हल्ला करून त्यांचे डोके फोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्यात एकूण सात टाके पडले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संगित अंबादासराव हेंडगे (वय ५४, रा. पुस) हे शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दिनांक ३ मे २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास ते पुस ते परळी जाणाऱ्या रोडवरील शिवाजी चौक येथील कमानीजवळ सचिन उदार आणि शशिकांत पवार यांच्याशी बोलत उभे होते. यावेळी गावातीलच शिवा हरीभाऊ उपाडे हा त्यांच्या जवळ आला आणि त्याने दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. हेंडगे यांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला, ज्याचा राग मनात धरून आरोपीने त्यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
रागाच्या भरात असलेल्या शिवा उपाडे याने हेंडगे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत असतानाच आपल्या हातातील लोखंडी गजाने त्यांच्या डोक्यावर दोन ठिकाणी जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात हेंडगे यांचे डोके फुटून ते रक्तबंबाळ झाले. उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी तात्काळ मध्यस्थी करून पुढील अनर्थ टाळला. या प्रकरणी संगित अंबादासराव हेंडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शिवा हरीभाऊ उपाडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याची नोंद बर्दापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार विनोद कदम हे करीत आहेत.