Breaking
Updated: मे 4, 2026
धारूरमध्ये मद्यधुंद तरुणांचा धुमाकूळ; पोलीस उपनिरीक्षकावर दगडफेक करत शासकीय कामात अडथळा, पाच जणांवर गुन्हा दाखल
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelमाजलगाव: माजलगाव तालुक्यातील टालेवाडी येथील एका पित्याने आपल्या दोन चिमुकल्या मुलींच्या अंगावर डिझेल ओतून त्यांना जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. पत्नी नांदायला येत नसल्याच्या रागातून हे टोकाचे पाऊल उचलण्यात आले असून, नातेवाईकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.
या प्रकरणी आश्विनी महेश सोमासे (वय ३३, रा. टालेवाडी, ता. माजलगाव) यांनी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, आश्विनी सोमासे आणि त्यांचे पती महेश विष्णू सोमासे यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण झाले होते, त्यामुळे त्या मागील काही दिवसांपासून माहेरी लहामेवाडी येथे राहत होत्या. १६ एप्रिल रोजी महेश सोमासे लहामेवाडी येथे गेले आणि त्यांनी आश्विनी यांना नांदायला चालण्यास सांगितले. मात्र, वारंवार होणाऱ्या भांडणामुळे आश्विनी यांनी येण्यास नकार दिला. तेव्हा महेश सोमासे यांनी आपल्या दोन्ही मुली मृणाल (वय ५) आणि मृणमय (वय ४) यांना जबरदस्तीने सोबत नेले आणि “तू नांदायला आली नाहीस तर मुलींना जाळून मारीन” अशी धमकी दिली होती.
दिनांक २ मे २०२६ रोजी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास महेश सोमासे पुन्हा लहामेवाडी येथे दुचाकीवर दोन्ही मुलींना घेऊन आले. त्यांनी पुन्हा पत्नीला नांदायला येण्यासाठी दबाव टाकला. आश्विनी यांनी चार-पाच प्रतिष्ठित माणसांना घेऊन बैठक करून वाद मिटवण्याची विनंती केली, मात्र महेश सोमासे यांनी संताप व्यक्त करत पिशवीतील डिझेलचा कॅन काढला. त्यांनी दोन्ही मुलींच्या अंगावर डिझेल ओतून काड्यापेटीने त्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न केला. यावेळी आश्विनी आणि त्यांच्या आईने आरडाओरडा केल्याने नातेवाईक आसाराम तान्हेबा चिंचोलकर यांनी तातडीने हस्तक्षेप करत महेश यांच्या हातातील कॅन आणि काड्यापेटी हिसकावून घेतली.
या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात महेश विष्णू सोमासे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९, ३५१(२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप नारायण राठोड हे करत आहेत.