Breaking
Updated: ऑगस्ट 16, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई : किमान तीन दशकांपासून शिकलकरी बांधव अंबाजोगाईत स्थायिक झाले आहेत. एकत्रित वस्ती निर्माण होऊनही तब्बल पंचवीस वर्षांचा कालावधी उलटला, मात्र या वस्तीवर प्रथमच तिरंगा फडकला तो यावर्षीच्या १५ ऑगस्टला. या क्षणी प्रत्येकाच्या डोळ्यांत अभिमानाचे आणि भावनांचे अश्रू दाटून आले.
व्हिडीओ पहा : https://www.facebook.com/share/v/19DuDJVQqs/
या भावनिक आणि तेवढ्याच देशप्रेमाने ओतप्रेत भरलेल्या उपक्रमासाठी ज्ञानप्रबोधिनीचे प्रसाद दादा चिक्षे यांचे प्रयत्न यशस्वी ठरले. गेल्या अनेक वर्षांपासून प्रसाद दादा हे शिकलकरी समाजातील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या सुखदुःखात धावून जाणाऱ्या प्रसाददादांच्या प्रेरणेमुळेच या वस्तीत पहिल्यांदाच तिरंगा फडकला.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून वस्तीवरील पार्वतीदिदींनी पुढाकार घेतला तर वस्तीतल्या मुलांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले. ध्वजवंदनानंतर राष्ट्रगीताच्या एकसूर गजराने वातावरण दुमदुमून गेले. त्यानंतर “स्वातंत्र्य म्हणजे काय?”, ” आता कशा पासून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे?” या विषयांवर लहान मुलांनी केलेल्या भाषणांनी उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर गुणदर्शनाचा रंगतदार कार्यक्रम झाला. उत्साह, टाळ्यांचा गजर आणि देशभक्तीच्या वातावरणात संपूर्ण वस्ती भारावून गेली.
या ऐतिहासिक क्षणाने शिकलकरी समाजाला एक नवीन ओळख दिली असून, मुलांच्या चेहऱ्यावरचे तेज आणि वस्तीतील प्रत्येकाच्या मनातील देशप्रेमाने स्वातंत्र्यदिन खऱ्या अर्थाने संस्मरणीय झाला. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रथमच फडकलेला तिरंगा शिकलकरी वस्तीसाठी अभिमानाचा क्षण ठरला.