Breaking

डोका गावात महिलेच्या घरात घुसून कोयता व तलवारीने हल्ला

Updated: July 4, 2025

By Vivek Sindhu

डोका गावात महिलेच्या घरात घुसून कोयता व तलवारीने हल्ला

WhatsApp Group

Join Now

बीड – तालुक्यातील डोका गावामध्ये एका महिलेच्या घरात घुसून तिच्यावर कोयता व तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बबीता भांगे असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. तिच्या पतीच्या फिर्यादीवरून सात जणांवर केज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या भांडणात झालेली केस मागे का घेत नाही? या कारणातून ही मारहाण झाल्याचे समोर आले आहे.
बीडच्या केज तालुक्यातील डोका येथे दि. 3 जुलै रोजी सकाळी सुनील भारत भांगे हे त्यांची म्हैस घराच्या समोर बांधत होते. यावेळी त्यांची मुलगी राजश्री यांना काहीजण हातात तलवार, कोयता, लोखंडी पाईप आणि दगड घेऊन आपल्या घराकडे येत असल्याचे दिसून आले. यानंतर सुनील भांगे हे घरी गेले असता विक्रम भागवत भांगे, सागर विक्रम भांगे आणि विशाल विक्रम भांगे हे कोयते व तलवार घेऊन त्यांना म्हणाले की, तुम्ही जुनी दाखल केलेली केस मागे का घेतली नाही? पुन्हा दोन दिवस अगोदर आमच्यावर का केस केली? असे म्हणून त्यांनी सुनीलची पत्नी बबीता भांगे हिच्यावर तलवारीने हल्ला केला. यात बबीता हिच्या दोन्ही खांद्याला गंभीर दुखापत झाली. यामुळे ती खाली पडली. त्यानंतर सुनीलचे
वडील भरत भागवत भांगे हे धावून आले असता त्यांच्यावर पण हल्लेखोरांनी डोक्यात व उजव्या हाताच्या मनगटावर कोयत्याने हल्ला चढवला. हे पाहून मुलगी राजश्री ही आरडा ओरड करत असताना तिला देखील लोखंडी पाईपने मारहाण
करण्यात आली. या भांडणात महिलेसह चौघे जखमी झाले आहेत. गंभीर जखमी झालेल्या बबिता भांगे हिच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी सात जणांविरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.