Breaking
Updated: एप्रिल 17, 2026
अंबाजोगाईत कत्तलीसाठी नेले जाणारे गोवंश जप्त; आरोपी अटकेत
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई शहरात बुरुज तलावासमोर गुरुवारी दुपारी पोलिसांनी मोठी कारवाई करत कत्तलीसाठी घेऊन जाणारा गोवंश जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ही यशस्वी कारवाई केली. यामध्ये तीन जर्सी गायी आणि एका गोऱ्यासह सुमारे साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीस कॉन्स्टेबल युवराज राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १६ एप्रिल २०२६ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास एका अशोक लेलँड टेम्पोमध्ये गोवंशीय जनावरे अत्यंत निर्दयपणे कोंबून कत्तलीसाठी नेली जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी पंचासह बुरुज तलाव परिसरात छापा टाकला असता, संशयित वाहन क्रमांक एमएच २५ एजे ६५८६ मिळून आले. या वाहनाची तपासणी केली असता त्यात तीन गायी आणि एक गोरा अत्यंत दाटीवाटीने आणि क्रूरपणे बांधलेले आढळले.
या कारवाईत पोलिसांनी आरोपी दशरथ शंकर जगदाळे, राहणार हिवरा, जिल्हा धाराशिव याला अटक केली आहे. जप्त केलेल्या जनावरांची किंमत ४३ हजार रुपये असून वाहनासह एकूण ३ लाख ४३ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. आरोपीने या मुक्या प्राण्यांना चारा-पाणी न देता कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक करून प्राण्यांचा छळ केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल गायकवाड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.