Breaking
Updated: जानेवारी 7, 2026
भारत-न्यूझीलंड सामन्याचे करणार मीडिया नियोजन
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: येत्या ११ जानेवारी रोजी वडोदरा येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात रंगणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मोठी घोषणा केली आहे. या महत्त्वाच्या सामन्याच्या मीडिया नियोजनाची जबाबदारी अंबाजोगाईचे भूमिपुत्र आणि क्रीडा अभ्यासक मोहित परमार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. बीसीसीआयच्या मीडिया नियोजन संघात त्यांची निवड झाल्याने अंबाजोगाईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
मोहित परमार यांना लहानपणापासूनच क्रिकेटची प्रचंड आवड आहे. त्यांनी २००७ पासून क्रिकेट प्रशिक्षक म्हणून कामाला सुरुवात केली. अंबाजोगाईत त्यांनी ‘अंबाजोगाई क्रिकेट अकॅडमी’ सुरू करून ग्रामीण भागातील खेळाडूंना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्याचे कार्य हाती घेतले. त्यांच्या या अकॅडमीतून आतापर्यंत ३९ खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर आपली मोहोर उमटवली आहे, तर एका महिला खेळाडूने प्रतिष्ठेच्या ‘महिला महाराष्ट्र प्रीमिअर लीग’मध्ये (WMPL) स्थान मिळवले आहे.
केवळ प्रशिक्षणच नव्हे तर क्रीडा पत्रकारितेतही परमार यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांना बीसीसीआयचे अधिकृत पत्रकार म्हणून मान्यता मिळाली होती. तसेच ते ‘स्पोर्ट्स प्लस’ या क्रिकेटला वाहिलेल्या वृत्तपत्राचे काम करतात. त्यांच्या याच अनुभवाची आणि क्रिकेट प्रति असलेल्या निष्ठेची दखल घेत बीसीसीआयने त्यांची निवड मीडिया नियोजन टीममध्ये केली आहे.
आगामी भारत-न्यूझीलंड सामन्याच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांचे व्यवस्थापन आणि नियोजन करण्याची जबाबदारी आता मोहित परमार पार पाडणार आहेत. या निवडीबद्दल क्रिकेट वर्तुळातून आणि अंबाजोगाईकरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.