Breaking
अंबाजोगाई : शहारालगत असलेल्या चतुरवाडी शिवारातील पेट्रोलपंप व्यवसायिक राहुल विजयकुमार कोपले यांच्या सतर्कतेमुळे डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत बनावट पिस्टल, डिझेलने भरलेले कॅन, तीन मोबाईल फोन्स, स्कॉर्पिओ गाडी यासह ३ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
२८ जून रोजी पहाटे तीनच्या सुमारास राहुल कोपले हे घराकडे जाताना पेट्रोलपंपाकडे गेले. यावेळी ट्रक क्रमांक AP 27 TY 8885 च्या डिझेल टाकीमध्ये पाईप टाकून डिझेल चोरी केली जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याठिकाणी तीन संशयित व्यक्ती आढळले. यातील दोन जण ट्रकजवळ होते आणि तिसरा इसम MH 02 AQ 4369 क्रमांकाच्या स्कॉर्पिओ गाडीत बसलेला होता. कोपले यांना पाहताच त्यांनी पल काढला. कोपले यांनी तत्काळ या गाडीचा पाठलाग सुरू केला आणि पोलिसांनाही माहिती दिली. त्यांनी चुलत भाऊ अरविंद व चंद्रकांत कोपले यांना देखील मदतीसाठी बोलावले. लोखंडी सावरगावजवळ कोपले यांनी चोरट्यांची स्कॉर्पिओ गाडी अडवली आणि त्यांना पेट्रोलपंपाजवळ येण्यास भाग पाडले.
यावेळी चोरट्यांपैकी दोन जण खाली उतरले आणि त्यांनी चोरी केलेले डिझेल परत देण्याची तयारी दर्शवली. मात्र, अचानक एका आरोपीने बनावट पिस्टल दाखवत कोपले यांना धमकावले आणि पळून गेला. त्यावेळी त्याच्या हातातील पिस्टल खाली पडली. त्याच्यासोबत दुसरा आरोपीही पसार झाला. तेवढ्यात पेट्रोलपंपावरील कामगार व ट्रकमधील ड्रायव्हर घटनास्थळी पोहोचले. अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. पोलीस, कोपले आणि पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून दोघा चोरट्यांना पकडले. त्यांनी आपली नावे सुनिल अण्णा बोटे (रा. देववाडी, सांगली), धनंजय बालाजी गायकवाड (रा. दगडवाडी, लातूर) अशी सांगितली. तिसऱ्या फरार आरोपीचे नाव योगेश गायकवाड (रा. च-हाटा, बीड) असल्याची माहिती मिळाली असून त्याचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी स्कॉर्पिओ गाडीची झडती घेतली असता, त्यामध्ये डिझेलने भरलेले ६ कॅन, बनावट पिस्टल, तीन मोबाईल फोन्स, स्क्रूड्रायव्हर, टॉर्च व रबरी पाईप आढळले. या प्रकरणी राहुल कोपले यांनी अंबाजोगाई पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबाजोगाई ग्रामीण पोलीस अधिक तपास करत असून फरार आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. हा प्रकार केवळ डिझेल चोरीपुरता मर्यादित न राहता, शस्त्र दाखवून धमकी देण्यापर्यंत पोहोचला असल्याने या गुन्ह्याचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. दरम्यान, राहुल कोपले यांनी समयसूचकतेसह दाखवलेल्या धाडसाचे कौतुक होत आहे.
Last Updated: June 29, 2025
Share This Post