Breaking
Updated: जून 4, 2026
अंबाजोगाईत स्वाराती रुग्णालयात ऐतिहासिक कामगिरी; ७५ वर्षीय महिलेच्या पोटातून काढला तब्बल ९ किलोचा गोळा!
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (स्वराती) स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र विभागाने एक ऐतिहासिक आणि कौतुकास्पद कामगिरी केली आहे. येथील डॉक्टरांच्या पथकाने अत्यंत गुंतागुंतीच्या आणि आव्हानात्मक शस्त्रक्रियेद्वारे एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेच्या पोटातून तब्बल ९ किलो वजनाचा आणि ४५ बाय ३९ सेंटीमीटर आकाराचा ट्यूमर (गाठ) यशस्वीरित्या बाहेर काढला आहे. ही अत्यंत जोखमीची शस्त्रक्रिया १ जून २०२६ रोजी पार पडली असून, या यशस्वी कामगिरीबद्दल वैद्यकीय क्षेत्रासह सर्वत्र या डॉक्टरांच्या पथकाचे मोठे कौतुक होत आहे.
संबंधित ७५ वर्षीय महिला रुग्ण २५ मे रोजी अत्यंत फुगलेले पोट आणि असह्य त्रास घेऊन स्वराती रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) तपासणीसाठी दाखल झाली होती. डॉक्टरांनी तत्काळ तिच्या सोनोग्राफी आणि सीटी स्कॅन तपासण्या केल्या असता, तिला अंडाशयाची मोठी गाठ (mucinous cystadenoma) असल्याचे निदान झाले. गाठीचे मूळ नेमके कुठे आहे हे स्पष्ट होत नव्हते, तसेच गाठीतील द्रव पोटात इतरत्र पसरू न देता ती अखंड बाहेर काढणे हे डॉक्टरांसमोर मोठे आव्हान होते. महिला रुग्ण वयोवृद्ध असण्यासोबतच मधुमेहग्रस्त असल्याने ही शस्त्रक्रिया अत्यंत जोखमीची होती, मात्र नातेवाईकांच्या संमतीनंतर डॉक्टरांनी हे आव्हान स्वीकारले.
अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली १ जून रोजी या महिलेवर लॅप्रोटोमी शस्त्रक्रिया करण्यात आली. लहान व मोठी आतडी सर्व बाजूंनी चिकटलेला हा सुमारे ९ किलो वजनाचा ‘लार्ज पॅर ओव्हेरियन म्युसिनस सिस्ट ऍडेनोमा’ नावाचा गोळा डॉक्टरांनी अत्यंत कौशल्याने बाहेर काढला. ही शस्त्रक्रिया यशस्वी करणाऱ्या पथकात पथक प्रमुख डॉ. प्रेषित चाटे, डॉ. नंदकिशोर मोरे, डॉ. वर्षा, डॉ. नेहा, डॉ. अमरा, डॉ. ज्ञानेश्वर सुशील आणि डॉ. अपर्णा कुलकर्णी यांच्यासह इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश होता. रुग्णालयाच्या वरिष्ठ प्रशासनाने या सर्व डॉक्टरांचे जाहीर अभिनंदन केले आहे.