Breaking

अंबाजोगाई लगतच्या सर्व प्रमुख रस्त्यांच्या चौपदरीकरणास मंजुरी; २७३ कोटींच्या निधीतून रस्त्यांचा होणार कायापालट

Updated: जून 25, 2026

By Vivek Sindhu

आ. नमिता मुंदडा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

आ. नमिता मुंदडा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

अंबाजोगाई: शहराच्या नागरी व दळणवळण विकासाला मोठी गती देणारा ऐतिहासिक निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घेण्यात आला असून, एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या (ADB) विशेष निधीतून शहरातील प्रमुख रस्त्यांच्या चौपदरीकरणासाठी तब्बल २७३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. स्थानिक आमदार नमिता मुंदडा यांनी शासकीय पातळीवर केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश आले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे रामा-४८६ ते बोधेगाव, राक्षसवाडी, चिंचखंडी, भावठाणा, डोंगरपिंपळा, चनई ते रामा-४८७ या एकूण २७.३०० किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे भाग्य बदलणार असून, अंबाजोगाई शहरात येणारे सर्व प्रमुख प्रवेशमार्ग आता थेट चारपदरी स्वरूपात विकसित होणार आहेत.

या मंजूर विकासकामांतर्गत पहिल्या टप्प्यात एकूण रस्त्यांपैकी ५.३०० किलोमीटर लांबीचा रस्ता पूर्णपणे हायवेच्या धर्तीवर चारपदरी केला जाणार आहे. यामध्ये माता रमाबाई आंबेडकर चौक ते इंजिनिअरिंग कॉलेज रोड मार्गे मोरेवाडीपर्यंतचा सुमारे एक किलोमीटरचा रस्ता एका मोठ्या पुलाच्या बांधकामासह चारपदरी केला जाईल. हा नवीन मार्ग दोन्ही बाजूंच्या मुख्य चारपदरी रस्त्यांना जोडला जाणार असल्याने शहरातील अंतर्गत वाहतुकीचा ताण पूर्णपणे हलका होणार आहे. यासोबतच चनई किरमानी दर्गा ते मोरेवाडी चौक आणि इंजिनिअरिंग कॉलेज ते माता रमाई चौक या दरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे.

प्रकल्पाचा दुसरा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून मेडिकल कॉलेज अर्थात वैद्य चौक ते किरमानी दर्गा, चनई, दगडवाडी मार्ग तसेच किरमाणी दर्गा ते केज रोड कनेक्टिव्हिटी असा सुमारे ४.३०० किलोमीटर लांबीचा पूर्णपणे नवीन चारपदरी रस्ता विकसित केला जाणार आहे. हा मार्ग चनई येथून थेट आडस रोडकडे जाणाऱ्या चारपदरी रस्त्याला जोडला जाईल. आमदार नमिता मुंदडा यांच्या दूरदृष्टीतून साकारत असलेल्या या २७३ कोटींच्या विकासकामामुळे शहरातील जुनी वाहतूक कोंडी कायमची फुटणार असून अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होईल. तसेच मेडिकल कॉलेज, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औद्योगिक व नागरी भागांतील संपर्क अधिक वेगवान होऊन अंबाजोगाईच्या नागरी विस्ताराला एक नवी आणि आधुनिक दिशा मिळणार आहे.

या महत्वपूर्ण रस्ते कामांसाठी निधीसह मंजुरी दिल्याबद्दल आ. नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले आहेत.


Categories

Recent Posts