Breaking

“मी बीडचा वाघ, कोणाला घाबरत नाही” मुलावरील आरोपानंतर खा. बजरंग सोनवणे आक्रमक

Updated: जून 24, 2026

By Vivek Sindhu

“मी बीडचा वाघ, कोणाला घाबरत नाही” मुलावरील आरोपानंतर खा. बजरंग सोनवणे आक्रमक; नाव न घेता धनंजय मुंडेंवर जहरी पलटवार

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

नाव न घेता धनंजय मुंडेंवर जहरी पलटवार

केज: तालुक्यातील कदमवाडी येथील ‘गावकरी’ हॉटेलचे मालक विलास घुले यांच्या हत्येनंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून खासदार बजरंग सोनवणे यांनी आमदार धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत जाहीर टीका केली आहे. परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी विधानसभेत या हत्येचा मुद्दा उपस्थित करत हा पूर्वनियोजित कट असल्याचा संशय व्यक्त केला होता आणि मुख्य सूत्रधार शोधण्याची मागणी गृहविभागाकडे केली होती. यानंतर मृताच्या कुटुंबीयांनी खासदार सोनवणे यांचे सुपुत्र सौरव सोनवणे यांच्यावर संशय व्यक्त केल्यामुळे खासदार सोनवणे यांनी अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या मुलावरील आरोप हे जाणीवपूर्वक केले जाणारे राजकारण असल्याचे सांगत विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

आपल्या मुलावर होत असलेल्या आरोपांबद्दल खासदार बजरंग सोनवणे यांना विचारले असता ते म्हणाले, “केज तालुक्यात टाकळी फाट्यावर घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. पण ही घटना का घडली, भांडणे का झाली आणि विलास घुले तिथे का गेले, याच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे.” त्यांनी पुढे राजकीय विरोधकांवर तोफ डागताना स्पष्ट केले की, “माझ्या मुलाचे नाव या प्रकरणात घेणे, हे जाणीवपूर्वक केले जाणारे राजकारण आहे. मृताच्या कुटुंबीयांचा संशय असू शकतो, पण आमच्या इथे ‘कीड लागलेले’ राजकारण केले जात आहे. मुंबईत बसून काही नेते लोकांना चेतवण्याचे आणि भडकवण्याचे काम करत आहेत. मी या प्रकरणाला आणि पोलिसांच्या तपासाला पूर्ण सहकार्य करणार आहे. माझा मुलगा, माझे कुटुंब आणि कार्यकर्ते पोलीस यंत्रणेला हवी ती मदत करतील.”

विधानसभेत विलास घुले हत्याप्रकरणाचा मुद्दा उपस्थित करत धनंजय मुंडे यांनी गंभीर आरोप केले होते. या संदर्भाने खासदार सोनवणे यांना विचारले असता ते धनंजय मुंडे यांच्यावर चांगलेच संतापले आणि नाव न घेता म्हणाले, “ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही बोलताय, तो काय नेता आहे का? त्याची उंची काय, लायकी काय? अशांना तुम्ही नेता म्हणता?” मराठा विरुद्ध वंजारी असे वाद लावणारी मंडळी राजकारणात अकार्यक्षम असतात, म्हणूनच ते असले वाद लावतात आणि राजकारणामध्ये फिल्डवर उतरून रात्रंदिवस काम करावे लागते, केवळ मुंबईत बसून कामे होत नाहीत, अशी टीका त्यांनी केली. तुम्ही नेत्याचे नाव का घेत नाही? असे विचारले असता, सोनवणे ताडकन म्हणाले, “मी काय कोणाला घाबरतो का? भित्रा आहे का? मी बीडचा वाघ आहे!”

दरम्यान, २० जून रोजी घडलेल्या या घटनेचे तीव्र पडसाद विधिमंडळात उमटले आहेत. आमदार धनंजय मुंडे यांनी विधानसभेत हा मुद्दा लावून धरल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गृह खात्याला योग्य कारवाई आणि दखल घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही या प्रकरणी पोलिसांना निष्पक्ष आणि सखोल तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंडे बंधू-भगिनींनी हत्येचा सूत्रधार शोधण्याची मागणी केली असतानाच खासदार सोनवणे यांनी त्यांना दिलेल्या आक्रमक प्रत्युत्तरामुळे बीड जिल्ह्यातील हा राजकीय संघर्ष आता पूर्णपणे ऐरणीवर आला असून पोलिसांच्या पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Related Posts :

Categories

Recent Posts