Breaking
Updated: जून 23, 2026
सामूहिक बोअर बुजवल्याच्या वादातून वृद्धावर कुऱ्हाड आणि लोखंडी साखळीने जीवघेणा हल्ला; सहा जणांवर गुन्हा दाखल
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelधारूर: तालुक्यातील जहागीरमोहा येथे शेताच्या बांधावरील सामूहिक बोअर बुजवल्याचा जाब विचारल्याने ६७ वर्षीय वृद्ध शेतकऱ्यावर कुऱ्हाड, लोखंडी साखळी आणि गजाने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध बेकायदेशीर मंडळी जमवून मारहाण आणि घरफोडी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १३ जून २०२६ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली असून, मन्मथ रामभाऊ बिल्पे यांनी २२ जून रोजी स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन या संदर्भात रीतसर फिर्याद दिली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मन्मथ बिल्पे आणि आरोपी हे शेतशेजारी आहेत. त्यांच्या शेताच्या बांधावर सामूहिक बोअर आहे, जो आरोपींनी बुजवला होता. बिल्पे यांनी ‘बोअर का बुजवला’ असे विचारले असता, आरोपी विष्णू संभाजी बिल्पे, योगेश विष्णू बिल्पे, वसुदेव संभाजी बिल्पे, कृष्णा नारायण बिल्पे, मोहर विष्णू बिल्पे आणि शिवकन्या वसुदेव बिल्पे यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून त्यांना अश्लील शिवीगाळ सुरू केली. यावेळी आरोपी विष्णू याने हातातील कुऱ्हाडीच्या तुंब्याने मन्मथ यांच्या डोक्यात प्रहार करून त्यांना गंभीर जखमी केले, तर योगेश याने लोखंडी साखळीने त्यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. वसुदेव याने लोखंडी गजाने त्यांच्या डाव्या पायावर वार केले, तर इतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता चार आरोपींनी मन्मथ यांच्या घरात घुसून त्यांच्या पत्नीलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि घरातील महत्त्वाचे कागदपत्रे अस्ताव्यस्त करून सोबत पळवून नेले. धारूर पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला असून पोलीस हवालदार मुंडे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.