Breaking

ऊसतोड मजूर कुटुंबातील चार सख्ख्या बहिणींची पोलीस दलात निवड

Updated: जून 4, 2026

By Vivek Sindhu

ऊसतोड मजूर कुटुंबातील चार सख्ख्या बहिणींची पोलीस दलात निवड; जिवाचीवाडी गावासह केज तालुक्याचा गौरव!

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

जिवाचीवाडी गावासह केज तालुक्याचा गौरव!

​बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील डोंगरी भागात असलेल्या जिवाचीवाडी येथील एका गरीब ऊसतोड मजूर कुटुंबातील उषा, अर्चना, शीतल आणि गीतांजली हनुमंत चौरे या चार सख्ख्या बहिणींनी कमालीचा संघर्ष, जिद्द आणि कठोर कष्टाच्या जोरावर नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीत महाराष्ट्र पोलीस दलात एकाच वेळी स्थान मिळवले आहे. अत्यंत प्रतिकूल आणि हलाखीची आर्थिक परिस्थिती असतानाही, या चारही भगिनींनी अहोरात्र घेतलेली मेहनत आणि त्यांच्या आई-वडिलांच्या अखंड त्यागामुळे हे अभूतपूर्व यश मिळाले असून, सध्या संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील मुलींसाठी हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी ठरला आहे.

​हनुमंत चौरे आणि त्यांची पत्नी हे दोघेही वर्षानुवर्षे ऊसतोड मजूर म्हणून कष्ट करत आहेत. परिस्थिती कितीही कठीण असली तरी “मुली शिकल्या पाहिजेत आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत,” या एकाच ध्येयाने त्यांनी मुलींच्या शिक्षणात कोणतीही तडजोड केली नाही. मुलींनीही गावातूनच प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर, ग्रामीण भागातील मर्यादित सुविधा आणि आर्थिक संकटांचा सामना करत पोलीस भरतीचे स्वप्न मनात जिवंत ठेवले. एका अकॅडमीमध्ये प्रवेश घेऊन त्यांनी नियमित अभ्यास, कठोर शारीरिक सराव आणि स्वतःवरील विश्वासाच्या बळावर हे यश खेचून आणले.

​”आयुष्यभर कष्ट केले, पण मुलींना शिकवण्याचा निर्धार सोडला नाही. आज आमच्या चारही मुली पोलीस दलात दाखल झाल्या, यापेक्षा मोठा आनंद दुसरा नाही,” अशी अत्यंत भावनिक प्रतिक्रिया त्यांच्या आई-वडिलांनी दिली आहे. एकाच कुटुंबातील चार मुलींनी एकाच वेळी पोलीस दलात भरती होण्याची ही पहिलीच घटना मानली जात असून, या यशामुळे जिवाचीवाडी गावाचे नाव राज्यभर उज्ज्वल झाले आहे. “यशासाठी परिस्थिती नव्हे, तर जिद्द महत्त्वाची असते. ग्रामीण भागातील मुलींनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने मेहनत घ्यावी,” असा मोलाचा संदेश या चारही बहिणींनी आपल्या यशाच्या माध्यमातून दिला आहे.


Categories

Recent Posts