Breaking

वैद्यनाथ भक्ती मंडळाचे नगर परिषदेला निवेदन

Updated: जून 1, 2026

By Vivek Sindhu

वैद्यनाथ भक्ती मंडळाचे नगर परिषदेला निवेदन

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

सोमवारी मांस विक्री बंदीची प्रभावी अंमलबजावणी व सरस्वती नदीवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ भक्ती मंडळ यांच्या वतीने नगर परिषद परळी वैजनाथ यांना निवेदन देऊन “दर सोमवारी मांस विक्री बंदी” ठरावाची प्रभावी अंमलबजावणी करावी तसेच सरस्वती नदीवरील अवैध अतिक्रमणे हटविण्यासाठी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, परळी वैजनाथ हे पंचम ज्योतिर्लिंग क्षेत्र असून देशभरातील लाखो शिवभक्तांचे श्रद्धास्थान आहे. सोमवार हा प्रभू श्री वैद्यनाथांचा अत्यंत पवित्र दिवस मानला जात असल्याने धार्मिक भावना, परंपरा आणि भाविकांच्या श्रद्धेचा सन्मान राखण्यासाठी दि. 30 एप्रिल 2026 रोजी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत “दर सोमवारी मांस विक्री बंदी” ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता.

मात्र ठराव मंजूर होऊन पाच सोमवार उलटून गेले तरी नगर परिषद प्रशासनामार्फत प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नसल्याची खंत निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. शहरात व्यापक जनजागृती, व्यापाऱ्यांना स्पष्ट सूचना, लाऊडस्पीकरद्वारे माहिती, नियमित तपासणी मोहीम तसेच नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई यासंदर्भात अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याचेही मंडळाने नमूद केले आहे.

याशिवाय सरस्वती नदीवरील अवैध अतिक्रमणांमुळे नदीचे अस्तित्व आणि पर्यावरण धोक्यात येत असल्याने संबंधित अतिक्रमणे हटविण्यासाठी तातडीने मोहीम राबवावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

नगर परिषद प्रशासनाने मंजूर ठरावाची काटेकोर अंमलबजावणी करून नागरिक व शिवभक्तांच्या भावना जपाव्यात, अन्यथा भविष्यात लोकशाही मार्गाने आंदोलनाचा विचार करावा लागेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

या वेळी वैद्यनाथ भक्ती मंडळाचे दीपक जोशी, कुणाल चाटे, ओमकार मिरकले, अभिजीत गुटे, यश शेंद्रे, वैजनाथ वडे आदी उपस्थित होते.


Categories

Recent Posts