Breaking
Updated: जून 1, 2026
NEET पेपरफुटी प्रकरण: मास्टरमाईंड पी.व्ही. कुलकर्णीच्या बीडमधील अनधिकृत बांधकामावर हातोडा, स्वतःहून पाडकाम सुरू
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड: देशभरातील २२ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या आणि संपूर्ण देशात खळबळ उडवून देणाऱ्या ‘नीट’ (NEET) पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी सेवानिवृत्त प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी याच्यावर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. सीबीआयने अटक केल्यानंतर आता बीडमधील शाहू नगर भागात सुरू असलेल्या कुलकर्णीच्या चार मजली अनधिकृत इमारतीवर पालिकेचा हातोडा चालला आहे. बीड नगरपालिकेने दिलेल्या नोटीसचा अल्टिमेटम संपताच, संबंधित ठेकेदाराकडून हे अवैध बांधकाम स्वतःहून पाडण्यास सुरुवात झाली आहे. या संवेदनशील प्रकरणात सीबीआयने महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, लातूर आणि बीडमधून अनेकांना अटक केली असून, आरोपींची कसून चौकशी सुरू आहे.
व्हिडिओ पहा : https://www.instagram.com/reel/DZCiMu_is7V/?igsh=MTBnYTBpajVhdnM2dQ==
केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) केलेल्या तपासानुसार, लातूरमधील ‘आरसीसी’ (RCC) क्लासेसचे प्रा. शिवराज मोटेगावकर आणि प्रा. पी. व्ही. कुलकर्णी यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली असून, लातूरमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरूरे यांच्या फ्लॅटवर प्रा. कुलकर्णी क्लासेस चालवत असे. तसेच, मोटेगावकर क्लासेसमध्ये चालणाऱ्या ‘प्लॅटिनम गोल्ड बॅच’साठी विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांचे भरमसाठ शुल्क वसूल केले जात होते. कुलकर्णीचे महाराष्ट्र कनेक्शन समोर आल्यानंतर सीबीआयने त्याला लातूरमधून ताब्यात घेतले होते. तो पुण्यात ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मनीषा वाघमारेच्या संपर्कात होता, याच धाग्यावरून सीबीआयचे पथक त्याच्यापर्यंत पोहोचले. सध्या सीबीआयकडून कुलकर्णी, मोटेगावकर आणि शिरुरे यांच्यातील या मोठ्या नेक्ससचा कसून तपास केला जात आहे.