Breaking

डॉ. उपेंद्र कुलकर्णी यांच्या ग्रंथाचा महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून गौरव

Updated: मे 30, 2026

By Vivek Sindhu

डॉ. उपेंद्र कुलकर्णी यांच्या ग्रंथाचा महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून गौरव

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

 अंबाजोगाई – महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा मानाचा “गणेश सरस्वती ठाकूर देसाई पुरस्कार” ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ तथा दीनदयाल शोध संस्थान, बीडचे प्रकल्प प्रमुख डॉ. उपेंद्र कुलकर्णी आणि प्रा. रमेश रावळकर लिखित “डॉक्टर नावाचा माणूस” या ग्रंथाला जाहीर झाला असून पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या ग्रंथामध्ये प्रख्यात पोटविकार तज्ज्ञ डॉ. अ. ना. कुलकर्णी यांच्या वैद्यकीय सेवेचा, समाजाभिमुख कार्याचा आणि प्रेरणादायी जीवनप्रवासाचा प्रभावी शब्दचित्रांमधून वेध घेण्यात आला आहे. वैद्यकीय व्यवसायात कार्यरत असतानाही समाजाशी असलेली त्यांची बांधिलकी, सेवाभावी वृत्ती आणि रुग्णांप्रती असलेली आत्मीयता यांचे हृदयस्पर्शी चित्रण या ग्रंथातून करण्यात आले आहे.
आपल्या डॉक्टर भावाच्या कर्तृत्ववान आणि सेवाभावी व्यक्तिमत्त्वाला साहित्यरूप देत डॉ. उपेंद्र कुलकर्णी यांनी समाजासमोर प्रेरणादायी जीवनमूल्यांचा ठेवा उभा केला आहे. प्रा. रमेश रावळकर यांच्या सहलेखनामुळे ग्रंथ अधिक प्रभावी आणि वाचनीय झाला असून वाचकांकडून त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ लेखक अविनाश धर्माधिकारी आणि अभिनेते ऋषिकेश जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, शाल आणि रोख रक्कम असे होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी योगेश सोमन होते. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यवाह डॉ. स्वाती महाळंग तसेच कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
“डॉक्टर नावाचा माणूस” हा ग्रंथ वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभाव, निष्ठा, माणुसकी आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी यांचे प्रभावी दर्शन घडवणारा असल्याने साहित्य व वैद्यकीय क्षेत्रातील वाचकांसाठी तो प्रेरणादायी ठरत आहे. प्रत्येकाने आवर्जून वाचावा असा हा ग्रंथ असल्याची भावना साहित्यप्रेमी व्यक्त करत आहेत.
या मानाच्या पुरस्कारामुळे दीनदयाल शोध संस्थान, बीड तसेच साहित्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्राशी संबंधित सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा सन्मान संस्थेसाठी आणि सर्व सहकाऱ्यांसाठी अभिमानास्पद असून डॉ. उपेंद्र कुलकर्णी, प्रा. रमेश रावळकर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Categories

Recent Posts