Breaking

मुलीला पळवून नेल्याच्या रागातून दोन शेतकऱ्यांवर जीवघेणा हल्ला; एकाचा डोळा कायमचा निकामी

Updated: मे 5, 2026

By Vivek Sindhu

मुलीला पळवून नेल्याच्या रागातून दोन शेतकऱ्यांवर जीवघेणा हल्ला; एकाचा डोळा कायमचा निकामी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

आष्टी: शेतात नांगरणी करत असलेल्या दोन शेतकऱ्यांवर जुन्या वादाचा राग धरून लाकडी दांड्याने आणि कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना हिवरा शिवारात घडली आहे. या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा उजवा डोळा कायमचा निकामी झाला असून दुसऱ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैभव दिलीप शेळके (वय ३०, राहणार धानोरा, तालुका आष्टी) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. फिर्यादीचे वडील दिलीप शेळके आणि मामा नवनाथ तुकाराम घोडके हे ३ मे रोजी संध्याकाळी हिवरा येथील शेतात ट्रॅक्टरने नांगरणी करत होते. त्यावेळी आरोपी संतोष भाऊसाहेब लवांडे, रोहित संतोष लवांडे (दोन्ही राहणार हिवरा, तालुका आष्टी) आणि अशोक रामदास महाजन (राहणार गांगर्डानिमगाव, तालुका कर्जत) हे बेकायदेशीररीत्या तिथे आले.

आरोपींच्या नातेवाईक मुलीला पळवून नेल्याच्या एक वर्षापूर्वीच्या रागातून हा हल्ला करण्यात आला. आरोपींनी लाकडी दांडके आणि कुऱ्हाडीच्या तुंब्याने दिलीप शेळके आणि नवनाथ घोडके यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत दिलीप शेळके यांच्या डोळ्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचे दृष्टीपटल निकामी झाले असून पायही फॅक्चर झाला आहे. तसेच अशोक महाजन याने दिलीप शेळके यांच्या खिशातील १०,४०० रुपये रोख आणि मोबाईल जबरदस्तीने चोरून नेला.

घटनेनंतर जखमींना तातडीने अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९, ११८(१), ११९(१), ३५१(२) आणि इतर कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ भडके करत आहेत.


Categories

Recent Posts