Breaking
Updated: मे 5, 2026
बीडमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या हॉटेल चालकास पाच वर्षे सश्रम कारावास
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड: येथील इमामपुरा भागातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी शेख युनुस शेख लाल याला जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेश एस. घोरपडे यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला असून १९ मार्च २०२३ रोजी घडलेल्या या घृणास्पद घटनेत पीडितेच्या धाडसी साक्षीतून आरोपीला कायदेशीर चपराक बसली आहे. समाजात अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाचे स्वागत होत आहे.
घटनेच्या दिवशी सकाळी सातच्या सुमारास पीडित मुलगी दूध आणण्यासाठी आरोपी शेख युनुस याच्या चहाच्या हॉटेलवर गेली होती. त्यावेळी आरोपीने तिला फसवून हॉटेलच्या आत बोलावले आणि तिने नकार दिला असता तिचा हात धरून तिला ओढत नेले. आरोपीने पीडितेशी लज्जास्पद वर्तन करून विनयभंग केला. पीडितेने आरडाओरडा केल्यानंतर एका प्रत्यक्षदर्शीने तिथे धाव घेऊन आरोपीला जाब विचारला आणि मुलीची सुटका केली. या घटनेनंतर पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून पेठ बीड पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४-अ आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (पोक्सो) कलम ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
न्यायालयीन सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणातील काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फितूर झाले असतानाही, पीडितेची ठाम साक्ष, वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अहवाल आणि तपास अधिकाऱ्यांनी सादर केलेले पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरले.
हाय्यक सरकारी वकील अजय श्रीमंतराव तांदळे यांनी केलेला प्रभावी युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला. न्यायालयाने आरोपीला पाच वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली असून दंड न भरल्यास अतिरिक्त एक वर्ष कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन सपोनि जी.एल. अंतरप यांनी केला होता, तर न्यायालयीन कामकाजात पैरवी अधिकारी ऋषीकेश सानप आणि बाळासाहेब सानप यांनी सहकार्य केले. भररस्त्यात आणि सार्वजनिक ठिकाणी मुलींवर होणाऱ्या अशा अत्याचारांविरुद्ध न्यायालयाने दिलेला हा निकाल पीडितेला न्याय देणारा आणि गुन्हेगारांवर वचक बसवणारा ठरला आहे.