Breaking

धारूरमध्ये मद्यधुंद तरुणांचा धुमाकूळ; पोलीस उपनिरीक्षकावर दगडफेक करत शासकीय कामात अडथळा, पाच जणांवर गुन्हा दाखल

Updated: मे 4, 2026

By Vivek Sindhu

धारूरमध्ये मद्यधुंद तरुणांचा धुमाकूळ; पोलीस उपनिरीक्षकावर दगडफेक करत शासकीय कामात अडथळा, पाच जणांवर गुन्हा दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

धारूर: तालुक्यातील घाटपाटी परिसरात मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालणाऱ्या पाच तरुणांनी पोलीस उपनिरीक्षकासह त्यांच्या पथकावर दगडफेक करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षकांच्या छातीला दगड लागून ते जखमी झाले असून पोलिसांनी यातील दोन आरोपींना घटनास्थळावरून ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब किशन भवर यांनी फिर्याद दिली आहे. २ मे २०२६ रोजी रात्री ११:५५ च्या सुमारास उपनिरीक्षक भवर हे आपल्या पथकासह गस्त घालत असताना त्यांना घाटपाटी येथील हॉटेल सह्याद्री सुरू असल्याचे आणि तिथे काही तरुण गोंधळ घालत असल्याचे दिसले. पोलिसांनी त्यांना हॉटेल बंद करून तिथून निघून जाण्याच्या सूचना दिल्या असता अमित कांताप्रसाद तिवारी, राहुल हजारी, सुजय गोकुळसिंग चव्हाण, अमित सद्देवाल आणि मोहन रहिकवाल (सर्व रा. धारूर) यांनी पोलिसांनाच अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

यातील आरोपी राहुल हजारी याने आपण पोलीस असल्याचे सांगत उपनिरीक्षक भवर यांना अंगावर धावून येत धक्काबुक्की केली आणि त्यांचा गळा धरून ओढाताण केली. पोलिसांनी जादा कुमक मागवली असता आरोपींनी अंधाराचा फायदा घेत पोलिसांच्या दिशेने बेछूट दगडफेक सुरू केली. यामध्ये एक दगड थेट उपनिरीक्षक भवर यांच्या छातीला लागला. दगडफेक सुरू असतानाच राहुल हजारी, अमित सद्देवाल आणि मोहन रहिकवाल हे दुचाकीवरून फरार झाले, तर अमित तिवारी आणि सुजय चव्हाण यांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले.

धारूर पोलीस ठाण्यात या पाचही आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मुकुंद ढाकणे हे करत आहेत.


Categories

Recent Posts