Breaking

मुलीला माहेरी नेण्यासाठी आलेल्या सासू-सासऱ्यांवर जावयाचा लोखंडी पाईपने प्राणघातक हल्ला

Updated: मे 4, 2026

By Vivek Sindhu

*मुलीला माहेरी नेण्यासाठी आलेल्या सासू-सासऱ्यांवर जावयाचा लोखंडी पाईपने प्राणघातक हल्ला*

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

शिरूर कासार: आपल्या विवाहित मुलीला लग्नासाठी चार दिवस माहेरी नेण्याची विनंती करणे एका दाम्पत्याच्या जीवावर बेतले आहे. शिरूर कासार तालुक्यातील घुगेवाडी येथे जावयाने आपल्या दोन भावांच्या मदतीने सासू आणि सासऱ्याला लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी पाईपने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित सासूने दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेणुका अंगदराव चौरे (वय ३५, रा. सिरसाट गल्ली, माजलगाव) यांची मुलगी नेहारिका हिचे लग्न घुगेवाडी येथील भगवान लक्ष्मण घुगे याच्याशी झाले आहे. २ मे २०२६ रोजी सकाळी मुलीने फोनवर बोलताना रडण्यास सुरुवात केल्याने रेणुका चौरे आणि त्यांचे पती अंगदराव चौरे काळजीत पडले. त्यांनी भाड्याने चारचाकी गाडी करून घुगेवाडी गाठले. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मुलीच्या सासरच्या अंगणात बसलेले असताना अंगदराव चौरे यांनी जावई भगवान घुगे याला विनंती केली की, गावाकडे बहिणीच्या मुलीचे लग्न असल्याने नेहारिकाला चार दिवस माहेरी येऊ द्या.

या साध्या विनंतीचा राग येऊन जावई भगवान घुगे याने सासू-सासऱ्यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. “तुमचा काटाच काढतो, तुम्हाला जिवंत सोडत नाही” अशी धमकी देत भगवान आणि त्याचा भाऊ अशोक लक्ष्मण घुगे यांनी अंगदराव यांचे गचुरे धरून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर भगवान याने जवळच असलेला लोखंडी पाईप उचलून रेणुका चौरे यांच्या कंबरेवर आणि डाव्या हाताच्या कोपऱ्यावर जोरात प्रहार केला. या हल्ल्यात रेणुका यांच्या हाताला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला. सोबत असलेले नातेवाईक विठ्ठल चेपटे आणि चालक महेश राऊत यांनी मध्यस्थी करून भांडण सोडवले.

जाताना भगवान घुगे, अशोक घुगे आणि कृष्णा लक्ष्मण घुगे या तिघांनी “मुलीला न्यायला परत आलात तर जिवे मारून टाकू” अशी धमकी दिली. शिरूर पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११५(२), ११८(१), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार अनिल तांदळे करीत आहेत.


Categories

Recent Posts