Breaking
Updated: मे 4, 2026
अंबाजोगाई तालुका खरेदी विक्री संस्थेच्या सर्व १७ जागांची निवडणूक बिनविरोध
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई तालुका खरेदी विक्री संस्थेच्या पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीत राजकारणातील दिग्गज नेत्यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली सर्व १७ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजाताई मुंडे, आमदार धनंजय मुंडे, नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा आणि ज्येष्ठ नेते अशोकराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक बिनविरोध पार पडली. तालुक्यातील सहकार क्षेत्रात सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत ही निवडणूक बिनविरोध घडवून आणल्याने राजकीय वर्तुळात या निर्णयाचे स्वागत होत आहे.
या निवडणुकीत एकूण १७ जागांसाठी प्रक्रिया राबवण्यात आली होती. यामध्ये वैयक्तिक मतदार संघातून ७ तर सोसायटी मतदार संघातून १० प्रतिनिधींची निवड करण्यात आली आहे. वैयक्तिक मतदार संघातून खुल्या प्रवर्गातून ॲड. जयसिंग आनंदराव चव्हाण आणि प्रदीप सदाशिवराव चव्हाण यांची निवड झाली. महिला प्रतिनिधी म्हणून दिपाबाई दिलीपराव देशमुख आणि छायाबाई गुलाबराव गंगणे यांनी बाजी मारली आहे. इतर मागास प्रवर्गातून नागोराव पांडुरंग माले, अनुसूचित जाती प्रवर्गातून बंडू भीमराव जोगदंड आणि भटक्या जमाती प्रवर्गातून दिलीप नाथराव गित्ते यांची बिनविरोध निवड झाली आहे.
सोसायटी मतदार संघातून वसंतराव बप्पाजी कदम, पांडुरंग बाबुराव अंजान, सुधीर ज्ञानोबा चाटे, सचिन दामोदर शिंदे, मधुकर बालासाहेब काचगुंडे, हरिभाऊ भागवत निकम, आदिनाथ शंकरअप्पा शेटे, प्रतापराव तुकाराम आपेट, बालाप्रसाद रामगोपाल बजाज आणि अंकुश पुरुषोत्तम गायकवाड यांची संचालक म्हणून वर्णी लागली आहे. १९७० साली स्थापन झालेली ही संस्था तालुक्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावते. स्थापनेपासून ही संस्था सहकारमहर्षी स्व.ॲड. आनंदराव चव्हाण यांच्या ताब्यात होती.२०१२ पासून संस्थेच्या अध्यक्षपदी ॲड. जयसिंग आनंदराव चव्हाण हे असून संस्थेच्या वाटचालीत त्यांची भूमिका महत्वाची राहिली आहे. यावर्षी सर्वसंमतीने झालेल्या या निवडीमुळे संस्थेच्या पुढील वाटचालीस मोठे बळ मिळाले असून नेत्यांच्या एकीचे दर्शन या निमित्ताने घडले आहे.