Breaking

मस्साजोग ग्रामपंचायत निवडणुकीत धक्कादायक निकाल; दिवंगत संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव, स्वरूपानंद देशमुख विजयी

Updated: एप्रिल 29, 2026

By Vivek Sindhu

मस्साजोग ग्रामपंचायत निवडणुकीत धक्कादायक निकाल; दिवंगत संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव, स्वरूपानंद देशमुख विजयी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज: तालुक्यातील मस्साजोग ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज, २९ एप्रिल रोजी जाहीर झाला असून यात मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. या चुरशीच्या लढतीत दिवंगत माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना पराभवाचा धक्का बसला असून, त्यांचे प्रतिस्पर्धी स्वरूपानंद देशमुख यांनी ९२ मतांनी विजय मिळवला आहे. माजी सरपंचांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या या जागेसाठी अत्यंत तणावापूर्ण वातावरणात मतदान पार पडले होते, ज्याचा निकाल आज केज तहसील कार्यालयातील मतमोजणीनंतर स्पष्ट झाला.

आज सकाळी केज तहसील कार्यालयात मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली. एकूण तीन फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी पार पडली. पहिल्या फेरीपासूनच स्वरूपानंद देशमुख यांनी आपली आघाडी कायम ठेवली होती. पहिल्या फेरीत त्यांनी १५६ मतांची, तर दुसऱ्या फेरीत २० मतांची आघाडी घेतली होती. अश्विनी देशमुख या सुरुवातीपासूनच पिछाडीवर राहिल्याने अखेर स्वरूपानंद देशमुख यांनी ९२ मतांच्या फरकाने विजयावर शिक्कामोर्तब केले. या निकालानंतर स्वरूपानंद यांच्या समर्थकांनी गुलाल उधळून आणि घोषणाबाजी करत मोठा जल्लोष साजरा केला.

मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर २०२४ मध्ये अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती आणि हे सरपंचपद रिक्त झाले होते. पोटनिवडणुकीत दिवंगत संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुख स्वतः रिंगणात उतरल्याने या लढतीला मोठी भावनिक किनार प्राप्त झाली होती. सहानुभूतीच्या जोरावर अश्विनी देशमुख विजय मिळवतील असा कयास लावला जात होता, मात्र मतदारांनी स्वरूपानंद देशमुख यांच्या बाजूने कौल दिल्याने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

विजयानंतर माध्यमांशी बोलताना नवनिर्वाचित सरपंच स्वरूपानंद देशमुख यांनी हा विजय स्वाभिमानी मतदारांचा आणि गोरगरीब जनतेचा असल्याचे सांगितले. आपल्यावर झालेल्या विविध आरोपांना मतदारांनी मतपेटीतून चोख उत्तर दिले आहे, असे सांगत त्यांनी जनतेचे आभार मानले. तसेच, दिवंगत संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सुरुवातीपासून प्रयत्नशील होतो आणि इथून पुढेही त्यांच्या न्यायाच्या लढाईत आपण सदैव अग्रभागी राहू, अशी महत्त्वाची ग्वाही देखील स्वरूपानंद देशमुख यांनी या प्रसंगी दिली.


Categories

Recent Posts