Breaking
Updated: एप्रिल 16, 2026
चिंचोलीमाळी प्राथमिक आरोग्य केंद्राची नवी इमारत धूळखात पडून
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – चिंचोलीमाळी (ता. केज) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नव्याने बांधलेली इमारत मागील दोन ते तीन वर्षांपासून पडून आहे. या इमारतीचे हस्तांतरण करण्याऐवजी जुन्या इमारतीच्या दुरुस्तीवर लाखो रुपयांची उधळपट्टी करण्याचा घाट घातला आहे. म्हणून नवी इमारत वापरासाठी ताब्यात घेण्यात यावी, जुन्या इमारतीवर दुरुस्तीसाठी खर्च करण्यात येऊ नये, अशी मागणी विठ्ठल विनायकराव झाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
चिंचोली (माळी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची जुनी इमारत जीर्ण व कालबाह्य झाल्यामुळे नव्या इमारत उभारणीसाठी मंजुरी मिळाली होती. मागील दोन ते तीन वर्षांपूर्वी तीन ते साडे तीन कोटी रुपये खर्चून नव्या इमारतीची उभारणी करण्यात आली. संरक्षण भिंतीसह इतर किरकोळ कामे राहिल्याने या इमारतीचे हस्तांतरण झाले नाही. परिणामी, नवीन इमारत धूळखात पडून असून नव्या इमारतीमध्ये गावात, झाडे उगवली आहेत. त्यामुळे या इमारतीचा वापर होण्यापूर्वी दुरावस्था होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, जुन्या इमारतीच्या दुरुस्तीच्या कामाच्या मंजुरीवर लक्ष केंद्रित करीत दुरुस्तीच्या कामावर लाखो रुपयांची उधळपट्टी करण्याचा घाट घातला आहे. थातूर मातूर दुरुस्तीच्या कामातून जास्तीचे पैसे मिळत असल्याने हे दुरुस्तीचे काम मंजूर करून घेतले जात आहे. नवी इमारत आणखी किती दिवस तशीच पडून ठेवायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जुन्या दुरुस्तीचे काम करण्याऐवजी संरक्षण भिंतीचे काम व इतर राहिलेली किरकोळ कामे पूर्ण करून ही नवी इमारत वापरासाठी ताब्यात घ्यावी. जुन्या इमारतीच्या मलमपट्टीवर लाखो रुपयांची उधळण करू नये, अन्यथा आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा गावातील विठ्ठल विनायकराव झाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया बंद, सुविधांचा अभाव
जुन्या इमारतीत आरोग्य केंद्र व संरक्षण भिंत नसल्याचे कारण देत मागील अनेक वर्षांपासून या केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया बंद आहेत. त्यामुळे आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या गावातील महिलांना शस्त्रक्रियेसाठी इतर ठिकाणी जावे लागत आहे. तर नवी इमारत वापरात नसल्याने सोयी – सुविधांचा अभाव निर्माण झाला आहे.
ग्रा. प. ने दुरुस्तीच्या कामाला नाहरकत दिले
नव्या इमारतीचे हस्तांतरण करणे महत्वाचे असताना याकडे दुर्लक्ष केले जात आहे. केवळ जुन्या इमारतीच्या दुरुस्तीच्या नावाखाली पैसे कमविण्यासाठी हा दुरुस्तीचा घाट घातला आहे. तर या दुरुस्तीच्या कामासाठी ग्रामपंचायतीने नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे दुरुस्तीचे काम रद्द करण्यात यावे.
विठ्ठल झाडे , तक्रारकर्ते, चिंचोलीमाळी (ता. केज)