Breaking
Updated: मार्च 24, 2026
१९ टवाळखोरांवर कारवाई
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड येथील मीना बाजार परिसरात मुलींना त्रास देणाऱ्या आणि त्यांची छेड काढणाऱ्या टवाळखोरांविरुद्ध दामिनी पथकाने आक्रमक पवित्रा घेत गेल्या चार दिवसांत १९ जणांवर दणकेबाज कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे हुल्लडबाजांचे धाबे दणाणले आहेत.
या कारवाईबाबत सविस्तर माहिती अशी की, मीना बाजार परिसरात काही टवाळखोर तरुण मुलींचा पाठलाग करून त्यांना विविध खुणा व इशारे करून त्रास देत असल्याची गुप्त माहिती दामिनी पथकाच्या प्रमुख पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांना मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत पथकाने साध्या वेशात बाजार परिसरात गस्त सुरू केली. गस्तीदरम्यान काही तरुण मुलींच्या मागे फिरताना आणि अश्लील हावभाव करताना रंगेहात मिळून आले. या सर्वांना ताब्यात घेऊन बीड शहर आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.
पकडण्यात आलेल्या या १९ तरुणांवर मुंबई पोलीस अधिनियम कलम ११०/११७ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. केवळ कायदेशीर कारवाईवर न थांबता, पोलीस प्रशासनाकडून या तरुणांचे समुपदेशनही करण्यात आले आहे, जेणेकरून त्यांच्या वर्तणुकीत बदल घडावा. या यशस्वी कामगिरीत पीएसआय पल्लवी जाधव, सहायक फौजदार मीरा रेडेकर, पोलीस हवालदार शोभा जाधव आणि चालक पोलीस शिपाई अक्षय जाधव यांचा समावेश होता. महिलांच्या सन्मानाशी खेळणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट संकेत या कारवाईतून बीड पोलिसांनी दिला आहे.