Breaking

हुंड्यासाठी लग्न मोडले; १० लाख रुपये आणि सोन्याची मागणी करणाऱ्या अंबाजोगाईतील माय-लेकावर गुन्हा दाखल

Updated: मे 14, 2026

By Vivek Sindhu

बुक्की मारून पाडले दोन दात, नातेवाईकांविरुद्ध गुन्हा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई / धारूर: मुलीचे लग्न निश्चित झाल्यानंतर सासरच्या मंडळींनी १० लाख रुपये रोख, ७ ते ८ तोळे सोने आणि महागड्या उपकरणांची मागणी केली. ही मागणी पूर्ण न झाल्याने ठरलेले लग्न मोडून मुलीची बदनामी केल्याप्रकरणी वर आणि त्याच्या आईविरुद्ध धारूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धारूर येथील रहिवासी शकील जलील शेख यांनी यासंदर्भात पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची मुलगी मिस्बाह हिचा विवाह अंबाजोगाई येथील मिल्लतनगर भागातील रहिवासी आफताब चांद सय्यद याच्याशी निश्चित झाला होता. १९ डिसेंबर २०२५ रोजी त्यांचा साखरपुडा पार पडला, ज्यासाठी मुलीच्या वडिलांनी सुमारे ५ लाख रुपये खर्च केले होते. लग्नाची तारीख १२ मे २०२६ रोजी ठरवण्यात आली होती. मात्र, लग्नाच्या काही दिवस आधी २४ एप्रिल रोजी आफताब आणि त्याची आई हफीजुन्नीसा मुबारक अली सय्यद यांनी फिर्यादीच्या घरी जाऊन १० लाख रुपये रोख, ७ ते ८ तोळे सोने, एसी, मोटारसायकल, फ्रीज आणि डायनिंग टेबलची मागणी केली.

फिर्यादीने आपली आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचे सांगून ही मागणी पूर्ण करण्यास असमर्थता दर्शवली आणि ठरल्याप्रमाणे लग्न करण्याची विनंती केली. मात्र, आरोपींनी लग्नास नकार दिला आणि मुलीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची नातेवाईकांमध्ये बदनामी केली. साखरपुड्यात दिलेली ५ ग्रॅम सोन्याची अंगठी आणि कपड्यांसाठी दिलेले ५० हजार रुपये देखील त्यांनी परत केले नाहीत. या फसवणुकीमुळे फिर्यादीचे मोठे आर्थिक आणि सामाजिक नुकसान झाले आहे. धारूर पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि हुंडाबंदी अधिनियमाच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवाजी सानप या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


Categories

Recent Posts