Breaking
Updated: फेब्रुवारी 27, 2026
पोलीसात तक्रार दिल्याच्या रागातून महिलेचा वाटेत अडवून विनयभंग : तिघा विरुद्ध गुन्हा दाखल
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज :- पती पत्नीला मारहाण झाली म्हणून पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गावाकडे परत जात असलेल्या दांपत्यास वाटेत अडवून महिलेचा विनयभंग केला. तसेच महिलेच्या पतीला आणि भांडण सोडविण्यास आलेल्या महिलेच्या सासू, सासऱ्यास लाथाबुक्याने व चापटाबुक्याने मारहाण केल्याची घटना जिवाचीवाडी ता. केज येथे घडली.
केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथील एक महिला ही पती, सासू, सासऱ्यासह केज पोलीस ठाण्यात भांडणाची तक्रार देऊन २५ फेब्रुवारी रोजी रात्री १०:०० वा.च्या सुमारास गावाकडे जात असताना तिला गावा जवळील हौदा जवळ रामधन बाबासाहेब चौरे, अंकुश जालींदर कुटे, अनुसया अंकुश कुटे यांनी त्यांच्या दुचाकी अडविल्या. रामधन चौरे याने महिलेस खाली ओढीत “तु पोलीस स्टेशनला का गेली होतीस?” असे म्हणत वाईट उद्देशाने साडी धरली. तर अंकुश याने वाईट उद्देशाने हात धरून “तुला नागडे करतोत. मग जा पोलीस स्टेशनला.” असे म्हणत विनयभंग केला. रामधन चौरे व अंकुश कुटे या दोघांनी लाथा बुक्क्याने पाठीत मारहाण करून मुक्कामार दिला. पीडित महिलेचे पती हे मारु नका असे म्हणत असताना रामधन व अंकुश या दोघांनी पतीला ही शिवीगाळ व लाथाबुक्क्याने मारहाण केली. पीडित महिलेचे सासु व सासरे हे भांडण सोडवण्यास मध्ये आल्याने त्यांना अनुसया हिने शिवीगाळ करून चापट बुक्क्याने मारहाण केली. अशी तक्रार पीडित महिलेने दिल्या वरून रामधन चौरे, अंकुश कुटे, अनुसया कुटे या तिघां विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु र नं ८९/२०२६ भा न्या सं ७४, ११५(२), ३५१(२), ३५२, ३(५) नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार पुरुषोत्तम शेप हे पुढील तपास करीत आहेत.
___________________________
काय आहे प्रकरण :-
दि. २५ फेब्रुवारी रोजी रात्री ८:०० वाजण्याचे सुमारास एका महिलेच्या नवऱ्याला त्यांच्या गावातील बाबासाहेब अभिमान नागरगोजे, नानासाहेब अभिमान नागरगोजे, अशोक बाबासाहेब नागरगोजे हे मारहाण करत असतांना त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून ती महिला भांडण सोडविण्यासाठी गेली होती. तिने भांडणाचा जाब विचारला असता, बाबासाहेब चौरे हा तिला म्हणाला की, “माझा मुलगा रामधन यास मारणार आहेत. तुम्ही आमचे बाजुने साक्ष का देत नाहीत ?” त्यावर ती महिला त्यांना म्हणाली की, “हे तुमच्या घरच भांडण आहे. त्याच आम्हाला काही बोलु नका. आमचा काहीएक संबंध नाही.” असे म्हणताच बाबासाहेब शंकर चौरे, यांनी त्या महिलेच्या पाठीवर पोटात व बरगडीवर लाथाबुक्यांनी मारहाण करून मुक्कामार दिला. तर संगिता बाबासाहेब चौरे, आशाबाई समाधान चौरे यांनी केसाला व हाताला धरून अश्लील भाषेत शिवीगाळ केली होते. तसेच बाबासाहेब अभिमान नागरगोजे, नानासाहेब अभिमान नागरगोजे, अशोक बाबासाहेब नागरगोजे यांनी खाली पाडुन लाथाबुक्याने व दगडाने मारहाण केली आणि तुम्ही आमचे बाजुने साक्ष दिली नाही तर आम्ही मुलगा रामधन चौरे याला मारून त्याचा आळ तुमच्यावर घेवुन पोलीस स्टेशन ला तक्ररा देतो. असे म्हणून शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या. या भांडणात त्या महिलेच्या गळ्यातील तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे मानीग्रामचे सोन्याचे मंगळसूत्र तुटून पडले होते.
यामुळे. त्या महिलेने केज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून बाबासाहेब शंकर चौरे, बाबासाहेब अभिमान नागरगोजे, नानासाहेब अभिमान नागरगोजे, अशोक बाबासाहेब नागरगोजे, संगिता बाबासाहेब चौरे आणि आशाबाई समाधान चौरे यांच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु र नं ८७/२०२६ भा न्या सं ११५(२), ११८(१), ३५१(२), ३५२, १८९(२) ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास पोलिस अधिकारी हनुमान मुंढे हे करीत होते.