Breaking
Updated: फेब्रुवारी 9, 2026
रेल्वे अर्थसंकल्पात घाटनांदूर-अंबाजोगाई-श्रीगोंदा मार्गाची उपेक्षा; ४० वर्षांपासून केवळ आश्वासनांचीच खैरात
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: केंद्र सरकारने नुकत्याच सादर केलेल्या रेल्वे अर्थसंकल्पात बीड जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या घाटनांदूर-अंबाजोगाई-श्रीगोंदा या रेल्वे मार्गासाठी एका रुपयाचीही तरतूद करण्यात आलेली नाही. गेल्या ४० वर्षांपासून या रेल्वे मार्गाची मागणी प्रलंबित असून, दरवेळी केवळ आश्वासनांवरच बोळवण केली जात असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेल्या या भागाकडे केंद्र व राज्य सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र या अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले आहे.
अंबाजोगाई हे शहर मराठवाड्याचे सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र असून या ठिकाणी दीड लाखांहून अधिक लोकसंख्या आहे. येथील योगेश्वरी देवी हे राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असून, आद्यकवी मुकुंदराज स्वामी आणि संत कवी दासोपंत यांची समाधी स्थळेही याच शहरात आहेत. ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या या शहराला रेल्वेने जोडण्याची मागणी कित्येक दशकांपासून होत आहे. या मार्गामुळे अंबाजोगाई थेट मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक या प्रमुख शहरांशी जोडले गेले असते. मात्र, अर्थसंकल्पात या मार्गाचे साधे नावही न आल्याने विकासाच्या गतीला पुन्हा एकदा खीळ बसली आहे.
रेल्वेची सुविधा नसल्यामुळे या भागातील नोकरदार, विद्यार्थी आणि पर्यटकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. अंबाजोगाईतून दररोज हजारो नागरिक रोजगारासाठी आणि शिक्षणासाठी पुणे-मुंबईसारख्या शहरांकडे जातात. रेल्वेअभावी या प्रवाशांना खासगी बसेस किंवा राज्य परिवहन मंडळाच्या बसवर अवलंबून राहावे लागते. सण-उत्सवांच्या काळात खासगी बस चालकांकडून अव्वाच्या सव्वा तिकीट दर आकारले जात असल्याने सामान्य जनतेची मोठी आर्थिक लूट होत आहे. घाटनांदूर ते श्रीगोंदा हा रेल्वे मार्ग झाल्यास ही लूट थांबून दळणवळणाचे एक स्वस्त आणि वेगवान साधन उपलब्ध होईल, अशी अपेक्षा जनतेला होती.