Breaking
Updated: फेब्रुवारी 7, 2026
ॲड. आर. एम. धायगुडे यांनी आरोपीच्या बाजूने केला प्रभावी युक्तिवाद
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelॲड. आर. एम. धायगुडे यांनी आरोपीच्या बाजूने केला प्रभावी युक्तिवाद
अंबाजोगाई: येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने एका बहुचर्चित खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी संतोष मांदळे (रा. लातूर) याला २ फेब्रुवारी २०२६ रोजी जामीन मंजूर केला आहे. पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले यांच्या फिर्यादीवरून बर्दापूर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या खुनाच्या गुन्ह्यात न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या संपूर्ण कायदेशीर लढाईत आरोपीच्या वतीने ॲड. आर. एम. धायगुडे यांनी न्यायालयात प्रभावी बाजू मांडली.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले यांना बर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शेतामध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पडल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (BNS) कलम १०३ (१) आणि ३ (५) अंतर्गत खुनाचा गुन्हा नोंदवला. तपासादरम्यान पोलिसांनी संशयावरून गोरोबा डावरे, संतोष मांदळे आणि इतर दोघांना ताब्यात घेतले होते. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपी गोरोबा डावरे याने मयत व्यक्ती सतत दारू पिऊन त्रास देत असल्याने त्याचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिल्याचा दावा पोलिसांनी केला होता.
प्राथमिक अटकेनंतर आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. त्यानंतर आरोपी संतोष मांदळे याने ॲड. आर. एम. धायगुडे यांच्यामार्फत अंबाजोगाईच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. अर्जावरील सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने पुराव्यांची स्थिती आणि कायदेशीर बाबींचा विचार करून संतोष मांदळे याला जामीन मंजूर केला. या यशस्वी युक्तिवादात ॲड. आर. एम. धायगुडे यांना ॲड. जी. डी. कांदे, ॲड. डी. ए. लोंढाळ, ॲड. अविनाश धायगुडे, ॲड. ओ. ए. लोंढाळ, ॲड. दयानंद गडदे, ॲड. पी. पी. धायगुडे आणि ॲड. अभिषेक अडसुळे यांनी तांत्रिक सहकार्य केले.