Breaking

धृपद संगीताची परंपरा टिकवण्यात गुंदेच्या घराण्याचे योगदान – मंगेश कराड

Updated: जानेवारी 6, 2026

By Vivek Sindhu

उमाकांत गुंदेचा यांना शंकरबापू धृपद गौरव पुरस्कार प्रदान

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

उमाकांत गुंदेचा यांना शंकरबापू धृपद गौरव पुरस्कार प्रदान

अंबाजोगाई : धृपद गायकीतून देवाची आराधना केली जाते. या संगीताची परंपरा जिवंत ठेवण्यात गुंदेचा घराण्याचे योगदान आहे. असे प्रतिपादन एमआयटीचे कार्यकारी अध्यक्ष मंगेश कराड यांनी रविवारी (दि.४) येथे केले. पद्मश्री शंकरबापू आपेगावकर धृपद गौरव पुरस्कार आंतरराष्ट्रीय ख्यातीचे धृपद गायक उमाकांत गुंदेचा व अनंत गुंदेचा यांना प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी मंगेश कराड बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी हे होते. निवृत्त आयुक्त उमाकांत दांगट, निवृत्त सिव्हिल सर्जन डाॅ. व्ही. डी. जाधव, राज्य निवड मंडळाचे माजी अध्यक्ष मधुकर कोकाटे, ज्येष्ठ नागरीक संघाचे राज्य अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. जगविख्यात पखवाज वादक उध्दवबापू आपेगावकर यांचीही व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांच्या हस्ते उमाकांत गुंदेचा यांना पद्मश्री शंकरबापू आपेगावकर धृपद गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप शाल, सन्मानपत्र व रोख रक्कम असे होते.

प्रारंभी धृपद संगित मैफल झाली. त्यात उमाकांत गुंदेचा व अनंत गुंदेचा यांचे धृपद शास्त्रीय गायन झाले. त्यांच्या या संगीत मैफिलीमध्ये उपस्थित मंत्रमुग्ध झाले होते. त्यांना उध्दवबापू आपेगावकर यांनी पखावजावर, मीना सोमवंशी आणि कल्याण शिंदे यांनी तानपु-यावर साथसंगत केली.

    या कार्यक्रमात उपस्थितांनी पद्मश्री शंकरबापूंच्या आठवणींना उजाळा दिला. 

नादब्रह्म काय असतो याची खरी जाणीव कै. शंकरबापूंनी करून दिली. या नादब्रह्माची प्रचिती धृपद गायनातून आल्याच्या भावना उमाकांत दांगट यांनी व्यक्त केल्या. राजकीशोर मोदी यांचे अध्यक्षीय भाषण झाले. उध्दवबापू आपेगावकर यांनीही आपले वडील तथा गुरू कै. शंकरबापू यांच्या आठवणींना उजाळा दिला.

सूत्रसंचालन आसाराम जोशी यांनी केले. प्रज्ञा आपेगावकर यांनी सन्मानपत्राचे वाचन करून उपस्थितांचे आभार मानले.

फोटो ओळी : अंबाजोगाई, ज्येष्ठ धृपद गायक उमाकांत गुंदेचा यांना पद्मश्री शंकरबापू आपेगावकर धृपद गौरव पुरस्कार प्रदान करताना मंगेश कराड, राजकिशोर मोदी, उमाकांत दांगट, डाॅ. व्ही. डी. जाधव,मधुकर कोकाटे, अण्णासाहेब टेकाळे, उध्दवबापू आपेगावकर आदी.


Categories

Recent Posts