Breaking
Updated: जानेवारी 2, 2026
माजलगावात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा छापा; १० लाखांचा मुद्देमाल जप्त
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelगौतम बचुटे/केज :- आंतर जातीय लग्न केलेल्या मुलीच्या आई-वडिलांनी जावयाच्या आई-वडीलांना मारहाण करून जखमी केले आहे.
केज तालुक्यातील वाघेबाभळगाव येथील शिवाजी वाघ यांचा मुलगा शरद वाघ याने विलास ठोंबरे यांची मुलगी वैष्णवी हिच्या सोबत मागील तीन वर्षा पूर्वी आंतरजातीय विवाह केलेला आहे. वैष्णवी व शरद वाघ हे दोघे बीड येथे राहतात.
दि. २८ डिसेंबर रोजी सकाळी ९:०० च्या सुमारास विजया वाघ व शिवाजी वाघ हे दोघे पती-पत्नी त्यांच्या गावातील बाळु शेलार यांचे शेतात कांद्याचे रोप आणण्यासाठी जात होते. त्याच रस्त्याने जात असलेले त्यांच्या सुन वैष्णवी हिचे वडील विलास यादवराव ठोंबरे व आई जयमाला विलास ठोंबरे व दोघे अनोळखी त्यांना पाहुन त्यांच्या जवळ गेले. विजया व शिवाजी वाघ हे कांद्याचे रोप उपटत असतांना विलास ठोंबरे याने त्यांना शिवीगाळ करून त्याने लोखंडी गज विजया वाघ यांच्या डोक्यात मारून दुखापत केली. तर जयमाला ठोंबरे हिने विळ्याने मारहाण करून गळ्यातील सोन्याची पोत तोडली. शिवाजी वाघ हे भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांच्या सोबतच्या दोन इसमांनी त्यांना काठीने मारून गंभीर जखमी केले.
त्या नंतर जखमींवर प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरघाट येथे प्रथमोपचार करून जिल्हा रुग्णालय बीड येथे संदर्भ सेवेसाठी हलविले. तिथून पुढे त्यांना बीड येथे लाईफलाईन हॉस्पीटल मध्ये अतिदक्षता विभागात दाखल केले.
त्या नंतर विजया वाघ यांच्या तक्रारी वरून त्यांची सून वैष्णवी हिचे आई-वडील जयमाला ठोंबरे, विलास ठोंबरे आणि दोन अनोळखी व्यक्ती या चौघा विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. ०५/२०२६ भा. न्या. सं. ११५(२), ११८(२), ३५१(२), ३५२, ३(५) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश क्षीरसागर हे या प्रकरणी तपास करीत आहेत.
विजया वाघ यांचा डावा हात आणि करंगळीला फ्रॅक्चर झाले आहे तर शिवाजी वाघ यांना मुकामार लागल्याने त्यांच्यावर बीड येथे उपचार सुरू आहेत.