Breaking

बोरगाव अंजनपूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी १४ कोटींचा निधी मंजूर; नवीन उभे उचल दरवाजे बसवण्यात येणार

Updated: सप्टेंबर 4, 2025

By Vivek Sindhu

आ. नमिता मुंदडा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मिळाले यश

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

आ. नमिता मुंदडा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मिळाले यश

अंबाजोगाई : तालुक्यातील बोरगाव अंजनपूर येथील निम्न पातळी बंधाऱ्याच्या दुरुस्ती व नवीन उभ्या उचल द्वारे बसवण्याच्या कामाला शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या कामासाठी तब्बल १३ कोटी ९० लाख १५ हजार ७८० रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला असून लवकरच याची निविदा निघणार आहे.

या प्रकल्पासाठी केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी गेली ३ ते ४ वर्षे सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा केला होता. मंत्रालयात अनेक बैठका घेण्यात आल्या. तसेच विधानसभा अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून या प्रकरणाला गती देण्यात आली होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

सन २००८ मध्ये बांधण्यात आलेल्या या बंधाऱ्याच्या गोडबोले पद्धतीच्या द्वारे, हायड्रॉलिक पंप, जॅक, असेंब्ली आदी भाग २०२१ पासून निष्क्रिय झाले होते. त्यामुळे पाणीसाठा होऊ शकत नव्हता. शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामात पाणीपुरवठ्याची अडचण निर्माण झाली होती. आता नवीन उभ्या उचल पद्धतीचे सात दरवाजे बसवले जाणार असून, यामुळे दरवर्षी शंभर टक्के पाणीसाठा होऊ शकेल, देखभाल खर्चही मोठ्या प्रमाणात कमी होईल.

हे काम पूर्ण झाल्यानंतर ३१० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार असून, खरीप आणि रब्बी हंगाम दोन्ही हंगामात शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री पंकजाताई मुंडे यांचे आ. नमिता मुंदडा यांनी आभार मानले आहेत.

शासनाचा हा निर्णय जाहीर झाल्यानंतर आ. नमिता मुंदडा यांनी सांगितले की, “हा प्रकल्प हाच माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा आहे. गेल्या काही वर्षांपासून मी यासाठी सतत प्रयत्न करत होते. अखेर सरकारने मान्यता दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.”

ही मंजुरी मिळाल्याने या भागातील शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे.


Categories

Recent Posts