Breaking

मुलगी कशी काय झाली, म्हणत विवाहितेला मारहाण

Updated: June 13, 2025

By Vivek Sindhu

मुलगी कशी काय झाली, म्हणत विवाहितेला मारहाण

WhatsApp Group

Join Now

पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल

बीड : तुला मुलगी कशी काय झाली, असे म्हणत मारहाण केली. त्यानंतर, चारित्र्यावर संशय घेतला. घर बांधायला पाच लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत विवाहितेचा छळ केला. हा प्रकार वडवणी तालुक्यात घडला. या प्रकरणी पतीसह सासरच्या चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

ऐश्वर्या चोले (२२) हिचे वडवणी तालुक्यातील खडकी येथील सिद्धेश्वर चोलेसोबत २०२२ मध्ये लग्न झाले होते. त्यानंतर, वर्षभर सासरच्या लोकांनी तिला सुखाने नांदविले; परंतु नंतर तिला त्रास सुरू झाला. वर्षभरानंतर तिला एक मुलगी झाली. मग तिला आणखीनच त्रास सुरू झाला. तुला मुलगीच कशी झाली, असा प्रश्न उपस्थित करत, तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यात आला. तिचा उपाशीपोटी शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. त्यानंतर, आपल्याला घर बांधायचे आहे. तुझ्या आई-वडिलांकडून पाच लाख रुपये आणि सोने घेऊन ये, असे म्हणून सासरचे लोक वारंवार त्रास देत असत. हा त्रास सहन न झाल्याने ऐश्वर्याने आई-वडिलांना फोन करून सांगितले. त्यानंतर तिचे चुलते ऐश्वर्याच्या घरी आले. त्यांना समजावून सांगितल्यानंतर दोन-चार महिने चांगले नांदविले. परत घर बांधायला पैसे आणि सोने घेऊन ये, म्हणून त्रास द्यायला सुरुवात झाली. त्यानंतर, तिला मारहाणही करण्यात आली. या प्रकरणी पती सिद्धेश्वर एकनाथ चोले, सासू किसकिंदा एकनाथ चोले, सासरा एकनाथ गणपती चोले, भाया कैलास एकनाथ चोले यांच्याविरोधात वडवणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.