गेवराई : पार्टनरशिपमध्ये शेततलाव दुरुस्तीचे काम करून लाखोंचा नफा मिळवून देतो, असे सांगून बापलेकाने मिळून एक व्यक्तीची तब्बल 13 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली. तसेच पैशाची मागणी केली असता पिस्तुल दाखवून जीव घेण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी भरत नवनाथ खेडकर (रा. वडाचीवाडी, ता. शिरूर कासार, जि. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, धनंजय दिनकर धसे (रा. श्री स्वामी समर्थ सोसायटी, बाणेर रोड, पाषाण, पुणे) याने 2006 मध्ये खेडकर यांच्या शेतात तलावाचे काम केले होते. त्यावेळी त्यांची ओळख झाली. पुढे 2016 मध्ये धसे गावात आल्यावर त्याने तलावातील गेलेल्या जमिनीबाबत मोबदला मिळेल असे सांगून फिर्यादीला शेततलाव दुरुस्ती व गाळ उपसण्याचे 50 लाख रुपयांचे काम मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
धनंजय धसे याने “आपण दोघे मिळून पार्टनरशिपमध्ये हे काम करू, तू 15 लाख दे, मी 15 लाख देतो. काम पूर्ण झाल्यावर 10-10 लाख नफा वाटून घेऊ” असे सांगून विश्वास संपादन केला. त्यानुसार फिर्यादी खेडकर यांनी वेळोवेळी रोख व बँक खात्यातून मिळून एकूण 13 लाख 50 हजार रुपये धनंजय धसे व त्याचा मुलगा देवाशिष धनंजय धसे यांना दिले.
पैसे घेतल्यानंतरही सदर काम सुरू झाले नाही. वारंवार विचारणा करूनही पैसे परत न करता धसे याने फोनवर पैशासाठी तगादा लावला तर माझ्याकडे पिस्तुल आहे, जीव घेऊ शकतो अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी धनंजय दिनकर धसे व त्याचा मुलगा देवाशिष धनंजय धसे यांच्याविरुद्ध आर्थिक फसवणूक व धमकी दिल्याचा गुन्हा चकलांबा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.