Breaking
परळी – आपल्या शेतजमिनीकडे जाणारा रस्ता खुला करून मिळावा, या मागणीकडे प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या एका शेतकऱ्याने परळी तहसील कार्यालयासमोर अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वर उद्धव दहीफळे असे या शेतकऱ्याचे नाव असून, उपस्थित नागरिक आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील मौजे सिरसाळा येथील गट क्रमांक ३९० मध्ये ज्ञानेश्वर दहीफळे यांची शेती आहे. मात्र, शेताकडे जाणारा पारंपरिक रस्ता अडवण्यात आल्याने त्यांना शेतीची मशागत करणे अशक्य झाले आहे. यामुळे जमीन पडीक पडून त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
याप्रकरणी त्यांनी १८ मार्च २०२४ रोजी तहसील कार्यालयात रस्ता खुला करण्यासाठी अर्ज दिला होता. मात्र, अनेक महिने उलटूनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. अखेर, ३० जून रोजी कुटुंबासह आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. दिलेल्या इशाऱ्यानुसार दहीफळे यांनी आज सोमवारी (दि.३०) तहसील कार्यालयासमोरच अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
सुदैवाने, घटनास्थळी उपस्थित नागरिक आणि पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून दहीफळे यांना रोखले आणि त्यांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे प्रशासकीय दिरंगाईचा आणि शेतकऱ्यांच्या समस्यांकडे होणाऱ्या दुर्लक्षाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
“रस्ता मिळाल्याशिवाय शेती करणे शक्य नाही. प्रशासनाने वेळेवर निर्णय न घेतल्यास आमच्यासारख्या शेतकऱ्यांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागते. याला तहसीलदार, तलाठी व मंडळ अधिकारी जबाबदार आहेत.”
– ज्ञानेश्वर उद्धव दहीफळे, आत्मदहनाचा प्रयत्न करणारा शेतकरी
Last Updated: June 30, 2025
Share This Post