Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

गोसेवा आणि समाजकार्याच्या माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंत पोहोचा

Updated: फेब्रुवारी 15, 2026

By Vivek Sindhu

WhatsApp Image 2026 02 15 at 4.05.16 PM

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन

अंबाजोगाई: महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री दर्जा लाभलेले शेखर मुंदडा यांनी अंबाजोगाई येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना समाजकारण आणि राजकारणाची योग्य सांगड घालण्याचे आवाहन केले. आमदार नमिता मुंदडा यांच्या निवासस्थानी आयोजित या सदिच्छा भेटीदरम्यान त्यांनी आपल्या आतापर्यंतच्या राजकीय आणि सामाजिक प्रवासाचा आढावा कार्यकर्त्यांसमोर मांडला. अध्यात्म, सेवा आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रांत काम करताना लोकहित कसे जोपासावे, याचे जिवंत उदाहरण त्यांनी आपल्या भाषणातून दिले.

मुंदडा यांनी आपल्या मार्गदर्शनात प्रामुख्याने गोवंश रक्षा आणि शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणावर भर दिला. कत्तलखान्याकडे जाणाऱ्या गायी वाचवण्यासाठी त्यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधून गेल्या चार वर्षांत साडेपाच कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. या माध्यमातून ५२०० हून अधिक गोवंशाचे प्राण वाचवण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले. केवळ भाकड झाली म्हणून गाय विकणाऱ्या शेतकऱ्याला थेट आर्थिक बळ देऊन तो गोवंश गोशाळेत सुरक्षित कसा राहील, यावर आयोगाचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच गोशाळांना स्वावलंबी करण्यासाठी गोमूत्र आणि शेणापासून विविध उत्पादने तयार करून त्यांचे ब्रँडिंग करण्याचे नियोजन राज्य सरकार करत असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी शेखर मुंदडा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील कामाचे कौतुक केले. पंकजा मुंडे यांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच गोसेवा आयोगासाठी ऐतिहासिक १२२ कोटी रुपयांची तरतूद झाल्याचे त्यांनी नमूद केले. गोशाळांना मिळणारे अनुदान आणि पर्यावरणपूरक अंत्यविधीसाठी लाकडांऐजी शेणापासून बनवलेल्या ‘गो-काष्ठ’चा वापर यांसारख्या नाविन्यपूर्ण संकल्पनांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी केवळ निवडणुकीपुरते मर्यादित न राहता सेवेच्या माध्यमातून जनमानसात स्थान निर्माण करावे, असा मोलाचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

याप्रसंगी प्रास्ताविकपर बोलताना नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा म्हणाले की, राजकारण हा पैसा कमवण्याचा व्यवसाय नसून ती सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याची आणि त्यांना न्याय मिळवून देण्याची एक महत्त्वाची संधी आहे. लोकप्रतिनिधींनी स्वतःचे व्यवसाय सांभाळून निस्वार्थपणे जनतेची सेवा केल्यास राजकारणाची प्रतिमा उंचावेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी भारतीय जनता सर्व पदाधिकारी, नगरसेवक यांच्यसह सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.


Categories

Recent Posts