Breaking

महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही – राज ठाकरे

महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही - राज ठाकरे

मुंबई – आपण हिंदू आहोत हिंदी नाही, अशा शब्दात राज ठाकरे यांनी हिंदीची सक्ती महाराष्ट्रात का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. मराठी भाषेची शक्ती दक्षिण भारतातील राज्यात कराल का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. आज भाषा सक्ती करत आहात, उद्या इतरही सक्ती होऊ शकते. म्हातारी मेल्याचे दुःख नाही मात्र काळ सोकावला जाईल, असे देखील राज ठाकरे यांनी म्हटले आहे. या संदर्भात राज ठाकरे यांनी सरकारला दिलेली पत्र देखील त्यांनी वाचून दाखवले. तसेच त्यांनी राज्यातील सर्व मुख्याध्यापकांना पत्र लिहिले असून राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. या निर्णयामागे आयएएस लॉबी असण्याची शंका त्यांनी उपस्थित केली आहे.

यासंबंधी महाराष्ट्रातील सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना राज ठाकरे यांनी पत्र लिहिले आहे. राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, हिंदी भाषा सक्तीची करणार नाही, याबाबत आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलणे चालू होते. आपण हिंदीची सक्ती करणार नसल्याचे तसेच हा निर्णय मागे घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते, असा दावा देखील राज ठाकरे यांनी केला आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्व मुख्याध्यापकांना आज माझे पत्र जाणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. यावेळी मुख्याध्यापकांना लिहिलेले पत्र देखील राज ठाकरे यांनी वाचून दाखवले.

सरकारला हिंदी भाषा का लागत आहे? असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला आहे. सरकारच्या या निर्णयामागे IAS लॉबीचा दबाव आहे का? अशी शंका देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केली. गुजरातमध्ये हिंदी सक्तीची नाही, मग महाराष्ट्रावर का लादत आहात? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. केंद्रात नरेंद्र मोदी आणि अमित शहा असताना गुजरातमध्ये हिंदी सक्तीची का नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

केंद्रात नरेंद्र मोदी आणि अमित शहा बसलेले असताना गुजरातमध्ये हिंदीची सक्ती नाही. आंध्र प्रदेश मध्ये नाही, तामिळनाडूमध्ये नाही, केरळ, कर्नाटकात नाही. अशा अनेक राज्यात हिंदीची सक्ती नाही. महाराष्ट्रात असे धोरण का लादले जाते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

सर्व भाषा या चांगल्याच असतात. एक भाषा उभी करण्यासाठी कित्येक पिढ्या खर्ची होतात. मात्र लहान लेकरांवर हिंदीची सक्ती लागता येणार नाही, अशा शब्दात राज ठाकरे यांनी राज्य सरकारला खडसावले आहे. केंद्राच्या धोरणात सक्तीचा कोणताच उल्लेख नाही. मग राज्य सरकार असे निर्णय का घेत आहेत? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी केंद्राच्या निर्णयावर देखील बोट ठेवले. शिक्षणासंबंधीच्या धोरणात तसा उल्लेख असल्याचे खोटे सांगितले जात असल्याचेही ते म्हणाले.

आज हा विषय लादला गेला तर ते मराठीचे अस्तित्व संपवून टाकतील, अशी भीती देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केली. त्यामुळे या संदर्भात सर्व पत्रकार, संपादक, लेखक, शाळांचे मुख्याध्यापक, राजकीय पक्ष, पालक यांनी या गोष्टीचा विरोधी करण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. राज्य सरकार शाळांमध्ये हिंदी विषय कसे शिकवतात, हे आम्ही पाहू असा इशारा देखील त्यांनी दिला. राज्य सरकारला हे आव्हान वाटत असेल तर आव्हान म्हणून घ्यावे. मात्र महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही.

Last Updated: June 18, 2025

By Vivek Sindhu

About Author

विवेक सिंधु हे बीड जिल्ह्यातील सर्वात जलद आणी अग्रगण्य न्यूज पोर्टल आहे, जे तुम्हाला तुमच्या भागातील घडामोडींचे ताजे अपडेट्स देते. आम्ही बीड जिल्यातील सर्व महत्वाच्या घटनांचे, कार्यक्रमांचे, राजकीय घडामोडींचे व समाजघटकांशी निगडित बातम्यांचे वस्तुनिष्ठ व जलद अपडेट्स देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत.

Share This Post

ग्रुप जॉईन करा