Breaking

अवैध शुल्क व मनमानी कारभार करणाऱ्या आपले सरकार केंद्रांवर  उपविभागीय अधिकाऱ्यांची धडक कारवाई 

WhatsApp Image 2025 06 30 at 8.18.31 PM 1

तीन सेवा केंद्रांचे परवाने रद्द, एका अवैध केंद्र चालकावर फौजदारी गुन्हा

अंबाजोगाई : शासनाने सर्वसामान्य जनतेला विविध शासकीय सेवा सुलभ व पारदर्शक पद्धतीने मिळाव्यात या उद्देशाने सुरु केलेल्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ ही योजना अंबाजोगाई तालुक्यात काही ठिकाणी लूटमाराचे साधन बनली आहे, हे समोर आल्यानंतर महसूल विभागाने धडक कारवाई करत एकाच दिवशी पाच सेवा केंद्रांची तपासणी केली. या कारवाईत गंभीर त्रुटी आढळून आल्याने तीन सेवा केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले असून एका केंद्राविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही तपासणी बल्लारपूर (जि. चंद्रपूर) येथील सामाजिक कार्यकर्त्या प्रिया झांबरे यांच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली. त्यांनी अंबाजोगाई येथील सेवा केंद्रांमध्ये जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र व इतर कागदपत्रांसाठी शासनाने निश्चित केलेल्या रकमेपेक्षा अधिक पैसे घेतल्याचे व्हिडीओसह सादर केले होते. या व्हिडीओ क्लिप्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर प्रशासन हरकत घेत उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक स्थापन करून कारवाई केली.

तपासणीअंती तीन केंद्रांचे परवाने रद्द, एका अवैध केंद्रावर गुन्हा

उपविभागीय कार्यालयाच्या पथकाने अंबाजोगाई शहरातील विविध ठिकाणी असलेल्या पाच सेवा केंद्रांची तपासणी केली. यामध्ये तहसील कार्यालयाजवळील गॅलक्सी मल्टीसर्व्हिसेस या ठिकाणी अवैधपणे केंद्र चालत असल्याचे निदर्शांसा आले. विनापरवाना केंद्र चालवून सय्यद मिर मुबीन अली मिर अर्शद अली हा नागरिकांकडून जात प्रमाणपत्रासाठी ४०० ते २ हजार रुपयेपर्यंत अवाजवी रक्कम घेत असल्याचे उघड झाले. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अमित अरुण माळी याच्या केंद्राचा मूळ परवाना जोगाईवाडी येथील असताना, प्रत्यक्षात सेवा केंद्र हे तहसील कार्यालयाजवळील इमारतीत सुरू असल्याचे आढळल्याने त्याचा परवाना रद्द करण्यात आला. बालासाहेब विष्णूदास जगताप व दत्तात्रय मोहन विर या दोन्ही केंद्रांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्याने त्यांचे देखील परवाने रद्द करण्यात आले. तर आर्यन मल्टीसर्व्हिसेस हे केंद्र बंद असल्याने त्याची तपासणी होऊ शकली नाही. या तपासणी पथकात नायब तहसीलदार श्री. गायकवाड, श्रीमती स्मिता बाहेती व श्री. गणेश जिडगे यांचा समावेश होता. त्यांनी संपूर्ण अहवाल उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे सादर केला असून, अहवालाच्या आधारे पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

मनमानी शुल्क आकारणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई : उपविभागीय अधिकारी

या कारवाईबाबत माहिती देताना उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे म्हणाले, ‘आपले सरकार’ सेवा केंद्रामार्फत शासनाच्या विविध योजना व सेवा जनतेपर्यंत पोहोचवण्याचा हेतू आहे. मात्र काही केंद्र चालकांकडून याचा गैरफायदा घेत जनतेची फसवणूक केली जात आहे. शासनाने निश्चित केलेल्या दरांपेक्षा जादा पैसे घेणे हा गंभीर प्रकार असून अशा मनमानी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

तपासणीमुळे जनतेत समाधानाचे वातावरण

ही कारवाई भविष्यातील इतर केंद्र चालकांसाठी इशारा ठरणार असून, या केंद्रांमधून होणारी लूट थांबविण्याच्या दिशेने ही महत्त्वाची पावले उचलली गेली आहेत. या तपासणीमुळे अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या गैरप्रकारांवर प्रशासनाने कारवाई केल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ‘आमच्या कडून नेहमीच जादा पैसे घेतले जात होते. आता निदान सरकारी यंत्रणा जागी झाली,’ असे स्थानिक नागरिकांनी सांगितले. 

नागरिकांना प्रशासनाचे आवाहन

आपले सरकार सेवा केंद्रातून कोणतीही सेवा घेताना शासनाने निश्चित केलेल्या दरांपेक्षा अधिक पैसे देऊ नयेत. तसेच प्रत्येक व्यवहारानंतर ऑनलाईन पावती आवश्यक आहे. कोणीही जादा रक्कम मागितल्यास तत्काळ तक्रार करावी असे प्रशासनाने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे.

Last Updated: June 30, 2025

By Vivek Sindhu

About Author

विवेक सिंधु हे बीड जिल्ह्यातील सर्वात जलद आणी अग्रगण्य न्यूज पोर्टल आहे, जे तुम्हाला तुमच्या भागातील घडामोडींचे ताजे अपडेट्स देते. आम्ही बीड जिल्यातील सर्व महत्वाच्या घटनांचे, कार्यक्रमांचे, राजकीय घडामोडींचे व समाजघटकांशी निगडित बातम्यांचे वस्तुनिष्ठ व जलद अपडेट्स देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत.

Share This Post

ग्रुप जॉईन करा