बीड : गेवराई शहरात मराठा आणि ओबीसी गटांमधील वाद चिघळल्यानंतर पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. दोन्ही गटांमधील तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी मध्यस्थी करून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, लक्ष्मण हाके आणि विजयसिंह पंडित यांनी एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन केलेल्या टीकेमुळे वातावरण आणखीनच तापले. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी रात्री उशिरा स्वत:हून गुन्हा दाखल केला. लक्ष्मण हाके यांच्यासह त्यांच्या 14 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हाकेंना परत पाठवले
सोमवारी गेवराई येथे झालेल्या राड्यानंतर लक्ष्मण हाके यांना पोलिसांनी नोटीस बजावली होती आणि या नोटिशीला उत्तर देण्यासाठी लक्ष्मण हाके गेवराईकडे निघाले होते.मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून गेवराई पोलिसांनी लक्ष्मण हाके यांना गेवराई तालुक्यातील नागझरी येथे थांबवलं. लक्ष्मण हाके पोलिसांच्या विनंतीनंतर सध्या जालन्यातील वडीगोद्री येथे परतले.बीड जिल्ह्यामध्ये जमाबंदीचे आदेश लागू असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून लक्ष्मण हाके यांना रोखल्याची माहिती आहे.
जमावबंदी आदेश लागू
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी गेवराई शहरात पुढील 15 दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास, कोणतेही मोर्चे, आंदोलने किंवा निदर्शने करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
गेवराईत पुढील पंधरा दिवस आंदोलन आणि निदर्शनावर बंदी
बीड जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील वडीगोद्री परिसरात मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. या ठिकाणी मराठा आणि ओबीसी गटांच्या उपोषण आणि आंदोलनांमुळे तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे. पोलिस प्रशासनाने सर्व नागरिकांना शांतता राखण्याचे आणि कायदा व सुव्यवस्थेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
पोलिसांचा तटस्थ भूमिका
पोलिसांनी दोन्ही गटांना शांत करण्यासाठी तटस्थ भूमिका घेत प्रकरण हाताळले. सुरुवातीला दोन्ही गटांनी नरमाईची भूमिका स्वीकारल्याने वाद निवळेल असे वाटत होते. परंतु, वैयक्तिक टीकाटिप्पणीमुळे परिस्थिती पुन्हा चिघळली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत गुन्हे दाखल केले आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
जिल्हा प्रशासनाचे आवाहन
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. जमावबंदी आदेशांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले असून, कायदा व सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
बीड जिल्ह्यातील या घटनेमुळे सामाजिक सलोखा राखण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. पोलिस आणि प्रशासनाच्या तत्परतेमुळे सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी पुढील काही दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत.