पाटोदा : चुंबळी फाटा–तांबाराजुरी दरम्यान पुलाजवळ झालेल्या ट्रक अपघातानंतर अनोळखी लोकांनी तब्बल ३६० भरलेल्या इण्डेन गॅस टाक्या चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पाटोदा पोलिस ठाण्यात चालकासह अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इण्डेन गॅस कंपनीचे मॅनेजर निलेश पांडुरंग पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 24 ऑगस्ट रोजी पहाटे 2.30 वाजता ट्रक क्र. MH-09 GJ-3197 हा प्रविण श्रीराम जोगदंड (रा. वानगाव, जि. बीड, ह.मु. भोसे, ता. खेड, जि. पुणे) याच्या ताब्यात होता. हा ट्रक भरधाव व निष्काळजीपणे चालवल्याने पुलाजवळ पलटी झाला. अपघातात आत बसलेला क्लीनर किरकोळ जखमी झाला.
दरम्यान, अपघाताचा फायदा घेत अनोळखी व्यक्तींनी घटनास्थळावरून गॅसने भरलेल्या 360 टाक्या चोरून नेल्या. प्रत्येक टाकीची किंमत सुमारे 1,500 रुपये असून एकूण 5 लाख 40 हजार रुपयांचा माल चोरीस गेला आहे.
या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सपोनि भाबड करीत आहेत.