Breaking
बाहेर राहून अधिकाऱ्यांचे अपडाऊन
केज – ग्रामीण जीवनाशी आणि कृषी क्षेत्राशी निगडित असलेले मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी मंडळ अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी हे ५० ते १०० किमी दूर अंतरावर राहून अपडाऊन करीत नोकरी करीत आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्यांना नैसर्गिक आपत्तीच्या काळात तरी मुख्यालयी राहण्याचे आदेश द्यावेत. अशी मागणी शेकापचे युवा नेते भाई मोहन गुंड यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे.
बीड जिल्ह्यातील बहुतांश तलाठी, मंडळ अधिकारी हे शहरात खाजगी कार्यालय थाटून तेथूनच आपल्या सज्जाचा कारभार हाकत आहेत. तर स्वतःचे खाजगी रायटरमार्फत कामकाज करीत असून रायटरकडे कोऱ्या आवश्यक कागदपत्रावर स्वाक्षऱ्या करून ठेवतात. त्यामुळे शेतकऱ्याची आणि या अधिकाऱ्यांची कधी भेट होत नसून खाजगी रायटरच्या खर्चाचा बोजा शेतकऱ्यांवर पडत आहे. तर कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी हे कार्यालयात दिसून येत नसून त्यांचे संपर्क मोबाईल नंबर ही कार्यालयाच्या दर्शनीय भागावर दिसून येत नाहीत. तर ज्या अधिकाऱ्याकडे काम आहे, अशा अधिकाऱ्यांबद्दल विचारणा केल्यास ते साइटवर गेल्याचे सांगून वेळ मारून नेली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची ससेहोलपट होत असून चकरा मारून शेतकरी थकतात. ग्रामपंचायत अधिकारी हे आठवड्यातून एक – दोन दिवस हे ग्रामपंचायत कार्यालयाला औपचारिकपणे भेट देऊन एक – दोन तास बसून माघारी फिरतात. तर बहुतांश ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा कारभार पंचायत समिती कार्यालयात बसून सुरू आहे. तर जिल्ह्यातील बहुतांश मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी मंडळ अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी हे मुख्यालयापासून ५० ते १०० किलोमीटर दूर अंतरावरुन राहून अपडाऊन करीत तालुक्याच्या ठिकाणी येऊन नौकरी करीत आहेत. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती झाली, त्यांना दुसऱ्या दिवशी कोणाच्या तरी सांगण्यावरून व बातमी बघून कळते. रात्री गावात पाऊस झाला, केवळ पंचनामा करायला येतात. याची दखल घेऊन येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात महसुल, कृषी, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहावे, असे तात्काळ आदेश द्यावेत. जे अधिकारी मुख्यालयी राहणार नाहीत, अशा अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड, ॲड. गोले, भाई अशोक रोडे, भाई अर्जुन सोनवणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
अपडाऊनमुळे अधिकाऱ्यांना वेळेचे बंधन नाही
महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी हे ५० ते १०० किमी दूर अंतरावर राहून अपडाऊन करतात. त्यामुळे वेळेवर कार्यालयात हजर राहून शकत नाहीत. त्यांना वेळेचे बंधन नसल्याने शेतकरी, नागरिकांची परेशानी होत असून वेठीस धरले जात आहे. पुढाऱ्यांचे हस्तक बनलेल्या अधिकाऱ्यांचा मग्रूरपणा वाढत आहे. अधिकाऱ्यांनी जनतेचे सेवक असल्याचे भान ठेवावे. त्यांचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही.
भाई मोहन गुंड
शेकाप, बीड.
केज शहराच्या बाहेर नेण्यात आलेल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला गुरुवारी सकाळी ११ वाजता भाई मोहन गुंड यांनी भेट दिली असता एक कर्मचारी सोडता इतर अधिकारी आले नव्हते. तर शेतकरी हे सकाळी नऊ वाजेपासून अधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत बसले होते. त्यामुळे अधिकाऱ्यांना वेळेचे भान राहिले नसल्याचा आरोप भाई गुंड यांनी केला आहे.
Last Updated: June 27, 2025
Share This Post