Breaking
जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत खा.बजरंग सोनवणे यांच्या अधिकाऱ्यांना सुचना
बीड: जिल्ह्यात विविध रस्त्यावर ब्लॅकस्पॉट आहेत. शिवाय राष्ट्रीय महामार्गावर अतिक्रमणे वाढत आहेत. यामुळे अपघात होत असून अपघात टाळण्यासाठी अतिक्रमणे काढा आणि अपघातस्थळी तातडीने रूग्णवाहिका पाठवा, अशा सुचना खा.बजरंग सोनवणे यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी १२.३० वाजता जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक आयोजीत केली होती. यावेळी खा.बजरंग सोनवणे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रेहमान आणि विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना खा.बजरंग सोनवणे म्हणाले, अपघाताचे प्रमाण हे सायंकाळी व पहाटे जास्त असते. या दरम्यान आपल्या यंत्रणेने सतर्क राहायला हवे. जिल्ह्यात अनेक असे अतिक्रमण आहेत, ज्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. ते अतिक्रमण काढण्याचा सूचना केल्या. विशेषत: गेवराई तालुक्यातील गढी भागात अनेक वेळा अपघात झालेले आहेत. त्या ठिकाणी तांत्रिक सुधारणा करण्याच्या सूचना केल्या. जिल्ह्यात कोठेही अपघात झाला तर त्या ठिकाणी रुग्णहिका तात्काळ मिळावी, यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांना सूचना केल्या. माजलगाव तालुक्यातील सादोळा येथील पुलाचे काम तातडीने सुरू करावे असे म्हणत, लोकांची अडवणूक होणार नाही, याची काळजी घ्या, असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला. दरम्यान, तेलगाव या ठिकाणी रस्त्याचे पाणी व्यवस्थित न काढल्यामुळे त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहेत. ते दुरुस्ती करण्यात यावे. राष्ट्रीय महामार्ग खात्याचे स्वतंत्र ऑफिस बीड जिल्ह्यात होण्यासाठी आर.ओ ऑफिसला प्रस्ताव पाठवा, अशा सुचना देखील दिल्या. राष्ट्रीय महामार्ग संस्थेचे स्वतंत्र कार्यालय बीडला झाल्यास जिल्ह्यातील कामे वेळेत मार्गी लागतील, अशी अपेक्षाही यावेळी त्यांनी व्यक्त केली. खरवंडी-मादळमोही-पाडळसिंगी -गढी- माजलगाव या महामार्गावरील तालखेड फाटा, शृंगारवाडी फाटा व इतर सर्व ठिकाणी रस्ते कामाचा दर्जा अत्यंत खराब असल्यामुळे अपघात होत असले बाबत तक्रारी होत आहेत. भविष्यात अपघात होऊ नयेत यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्यात याव्यात, असेही म्हटले.
‘टॉप फाईव्ह’ विषयांना घातला हात
१. बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र.४५८ डी व ४५८ सी या रस्त्यावरील प्रमुख शहराभोवती नवीन बायपास/ओव्हर ब्रिजेस (अंबाजोगाई -केज- नेकनुर-मांजरसुंबा-पाटोदा व माजलगाव शहर) करणे. या रस्त्यावरील अपघात होत असलेल्या भागातील दुरुस्तीची कामे तातडीने करणे.
२. पिंपळा धायगुडा-लोखंडी सावरगाव -केज- मांजरसुंबा-पाटोदा-चुंबळी फाटा हा रस्ता दुहेरी वाहतुकीचा करणे. अंबाजोगाई शहरात यशवंतराव चव्हाण चौकामधे इलेव्हेटेड पादचारी मार्ग तयार करणे.
३. राष्ट्रीय महामार्ग सुरत-चेन्नई साठी संपादन करणे आवश्यक असणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनाची सद्यस्थिती बाबत सविस्तर चर्चा केली.
४. रामा ५४८ माजलगाव- धारूर -केज या रस्ता कामाचा दर्जा अत्यंत खराब असल्यामुळे तेथे दररोज अपघात होत आहेत. संबंधित एजन्सी कडून तातडीने आवश्यक त्या सुधारणा करुन घेण्यात याव्यात. बर्दापूर-लोखंडी सावरगाव दुहेरी रस्ता करणे बाबत निविदा प्रक्रियेला वेग द्यावा.
५. पाटोदा व आष्टी तालुक्यातील पिठ्ठी-अंमळनेर-टाकळी काजी हा रस्ता तसेच गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन फाटा -उमापूर- शेवगाव हे दोन्ही रस्ते राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात यावा.
पालखी मार्गाचे काम निकषाप्रमाणे पुन्हा करावे
पैठण- पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग मधील डोंगरकिन्ही ते पारगाव घु.(अनपटवाडी) रस्त्याचा दर्जा अत्यंत खराब आहे. तसेच मळेकरवाडी घाटातील डांबरीकरणाचे काम वारंवार सूचना देऊनही अद्याप सुरु झालेले नाही. या रस्त्याच्या संपूर्ण कामात जागोजागी मोठ-मोठ्या भेगा पडलेल्या आहेत त्यामुळे रोज दुचाकी/चारचाकी वाहनांचे अपघात होत आहेत. पाटोदा शहरातील रस्ता काम अपूर्ण आहे. संपूर्ण रस्त्याचे काम अंदाजपत्रकातील निकषाप्रमाणे प्रमाणे पुन्हा करून घेण्यात यावे. एजन्सीवर आवश्यक ती कार्यवाही प्रस्तावित करावी. अतिरिक्त बाब या नावाने करण्यात आलेल्या अनावश्यक खर्चाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्यात यावी व जबाबदारी निश्चित करण्यात यावी, असे खा.सोनवणे यांनी म्हटले.
Last Updated: June 30, 2025
Share This Post