Breaking

कुंबेफळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वटवृक्षावर आपल्या हाताचा ठसा उमटवून झाला विद्यार्थ्यांचा प्रवेश

कुंबेफळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वटवृक्षावर आपल्या हाताचा ठसा उमटवून झाला विद्यार्थ्यांचा प्रवेश

ग्रामीण विद्यार्थी गुणवत्ता आणि मेहनतीच्या बळावर यशस्वी होतात – अक्षय मुंदडा
अंबाजोगाई (प्रतिनिधी) – तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंबेफळ येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चा नवागतांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात प्रभात फेरीने करण्यात आली. पहिलीतील नवागतांचे ट्रॅक्टर मध्ये मिरवणूक काढून जल्लोषात स्वागत करण्यात आले. नवागतांचे औक्षण करून फुल देऊन व पाऊलांचे ठसे घेऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर मुलांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वटवृक्षावर आपल्या हाताचा ठसा उमटवून माझा शाळेत प्रवेश झाला हे निश्चित केले. नवागतांना पुस्तकाचे तसेच गणवेशाचे वाटप करण्यात आले. ‘एक पेड, माॅं के नाम’ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.


यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून प्रवेशोत्सव मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमासाठी अंबाजोगाई तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सुवर्णकार तसेच प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते अक्षय मुंदडा, अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलासकाका सोनवणे, अधिव्याख्याता सायगुंडे सर, श्री.जामदार सर, विषय तज्ज्ञ रूद्राक्ष सर, गावचे सरपंच लिंगेश्वर तोडकर, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष व्यंकटेश किर्दंत, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष तथा माजी सरपंच गणेश भोसले यांच्यासह शिक्षणप्रेमी नागरीक उपस्थित होते. यावेळी बोलताना युवा नेते अक्षय मुंदडा म्हणाले की, आजच्या जगात ज्ञान हीच खरी संपत्ती आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जेवढे शिकाल तेवढे तुमचे भविष्य उज्ज्वल आहे. जीवन जगण्याचे बाळकडू शिक्षणातून मिळते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंबेफळ विविध उपक्रम राबविण्यात येतात. या शाळेने गुणवंत विद्यार्थी घडविले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी आज विविध क्षेत्रात गुणवत्ता आणि मेहनतीच्या बळावर यशस्वी होत आहेत असे गौरवोद्गार मुंदडा यांनी यावेळी काढले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिरगे सर यांनी केले. तर श्रीमती अंबुरे, संतोष गायकवाड, कसबे सर, श्रीमती पी.यु.जाधव, श्रीमती एम.व्ही.मुंडे, श्रीमती ए.एम.लांब, एम.एम.गायकवाड, श्रीमती तोडकर, श्रीमती जाधव, अतिथी निदेशक राहूल भिसे, श्री.जाधव सर, श्रीमती भोसले आदींनी परिश्रम घेतले.

Last Updated: June 18, 2025

By Vivek Sindhu

About Author

विवेक सिंधु हे बीड जिल्ह्यातील सर्वात जलद आणी अग्रगण्य न्यूज पोर्टल आहे, जे तुम्हाला तुमच्या भागातील घडामोडींचे ताजे अपडेट्स देते. आम्ही बीड जिल्यातील सर्व महत्वाच्या घटनांचे, कार्यक्रमांचे, राजकीय घडामोडींचे व समाजघटकांशी निगडित बातम्यांचे वस्तुनिष्ठ व जलद अपडेट्स देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत.

Share This Post

ग्रुप जॉईन करा