Breaking
Updated: ऑगस्ट 22, 2025
केज तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची मागणी
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelरमेश आडसकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घेतली भेट
केज – केज तालुक्यात मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने मांजरा नदीला आलेल्या पुरात अनेक गावांच्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते रमेश आडसकर यांनी बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी करून उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. नुकसानीची माहिती देऊन त्यांच्याकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली. उपमुख्यमंत्री पवार यांनी शेतकऱ्यांना लवकरच मदत दिली जाईल, असे आश्वासन ही दिले आहे.
मागील आठवड्यापासून केज तालुक्यात अतिवृष्टी झाल्यानंतर संततधार पाऊस सुरू आहे. मांजरा नदीला आलेल्या पुराने नदी काठच्या जमिनी वाहून गेल्या असून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर पिकांमध्ये पाण्याचे तळे साचल्याने पिके हातची गेल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश आडसकर यांनी बोरगाव, भोपला, राजेगाव, दैठणासह इतर गावांना भेटी देत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली होती. तर संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नुकसानीचे पंचनामे करीत नुकसानीचा अहवाल शासनाकडे लवकरात लवकर पाठवावा, अशा सूचना केल्या होत्या. तर स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन आडसकर यांनी शेतकऱ्यांना दिले होते. त्या आश्वासनाची पुर्तता त्यांनी केली. यावेळी बाजार समितीचे सभापती अंकुश इंगळे, युवानेते ऋषिकेश आडसकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमर पाटील यांच्यासह अनेक गावचे सरपंच, पक्षाचे कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.