Breaking
बच्चू कडू यांच्या उपोषणाला यश
मुंबई – राज्यातील घडामोडींना वेग आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा केली आहे. कर्जमाफीसाठी तातडीने समिती तयार केली जाईल, त्या समितीमध्ये बच्चू कडू यांना घेऊ. त्या समितीचा रिपोर्ट आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू, असं फडणवीस यांनी म्हटल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे, आज त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा सहावा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. दरम्यान आज अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपोषण स्थळी जाऊन बच्चू कडू यांची भेट घेतली आहे. त्यांनी बच्चू कडू यांच्यासमोरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून बच्चू कडू यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.
ज्या 17 मागण्या बच्चू कडू यांच्या आहेत, त्यासाठी आम्ही बैठक घेऊ, या बैठकीला सर्व विभागाचे मंत्री उपस्थित राहतील, या बैठकीला बच्चू कडू यांची देखील उपस्थिती असेल. दिव्यांगांचे अनुदान देताना ते बजेटमध्ये आणाव लागतं, त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनात ते मांडण्यात येईल. त्यामध्ये किती वाढ करायची, ते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री व बच्चू कडू ठरवतील.
दरम्यान शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर चर्चा झाली असता, मुख्यमंत्री म्हणाले की, कर्जदार शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती घेऊन तो डेटा जमा केला जाईल व नंतर त्यावर तोडगा काढू, असंही बावनकुळे यांनी यावेळी म्हटलं. मात्र त्यानंतर लगेचच बच्चू कडू यांनी तिथे उपस्थित शेतकऱ्यांना विचारलं की हा निर्णय तुम्हाला मान्य आहे का? त्यावर सर्वांनी आम्हाला हा निर्णय मान्य नसून, सरसकट कर्जमाफी व्हावी, असं म्हटलं आहे.
कर्जमाफी होईपर्यंत नवीन कर्ज देण्यासाठी मी येणाऱ्या कॅबिनेटमध्ये चर्चा करेल व निर्णय घेऊ, असं अश्वासनही यावेळी बावनकुळे यांनी दिलं आहे. मात्र बच्चू कडू हे अजूनही आपल्या उपोषणावर ठाम आहेत, आम्ही यावर समाधानी नाही, आम्ही उपोषण मागे घेणार नाही, असं यावेळी बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
Last Updated: June 13, 2025
Share This Post