Breaking
अंबाजोगाई : जादूटोणा केल्याच्या संशयातून एका महिलेला घरात घुसून शिवीगाळ व मारहाण केल्याची गंभीर घटना अंबाजोगाई तालुक्यातील पोखरी येथे घडली आहे. या प्रकरणी एका महिलेसह चार जणांविरोधात अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कलावती निकम या आपल्या पती व मुलांसह पोखरी येथे राहून शेती करून उपजीविका करतात. त्यांच्या फिर्यादीनुसार, त्या घरकाम करत असताना त्यांच्या भावकीतील ज्योतिराम दत्तू निकम, महादेव ज्योतिराम निकम, अशोक ज्योतिराम निकम आणि रंदावनी ज्योतिराम निकम या चार जणांनी त्यांच्या घरात घुसून त्यांच्यावर जादूटोणा केल्याचा आरोप करत शिवीगाळ केली. मोठ्या आवाजात वाद करत असताना त्यांच्यावर लाकडी काठीने वार करून दुखापत करण्यात आली. त्यांचा मुलगा नितीन यास देखील मारहाण करण्यात आली.
या झटापटीत त्यांचे पती लहू व दुसरा मुलगा मनोहर यांना देखील शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. मारहाणीत जखमी झालेल्या कलावती यांच्यावर स्वाराती रुग्णालयात उपचार करण्यात आले.
कलावती यांच्या तक्रारीवरून चारही आरोपींवर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Last Updated: June 30, 2025
Share This Post