Breaking
Updated: ऑगस्ट 18, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelपरळी : इतर वेळी कर्तव्यकठोर आणि रुक्ष वाटणारे पोलीस अधिकारी वेळप्रसंगी माणसाचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाचीही पर्वा करत नाही, याचे जिवंत उदाहरण परळी तालुक्यातील कौडगाव हुडा येथील दुर्घटनेत पाहायला मिळाले. रविवारी मध्यरात्री कौडगाव हुडा गावाजवळ मुसळधार पावसामुळे वाहून गेलेल्या कारमधील तरुणांचा जीव वाचवण्यासाठी अंबाजोगाईचे सहा. पोलीस अधीक्षक आयपीएस ऋषिकेश शिंदे यांनी थेट पुराच्या पाण्यात उडी घेतली. पुराच्या पाण्याचा प्रचंड वेग, अंधाराचे साम्राज्य आणि भीतीने थरथरणारे तरुण.. या सर्व परिस्थितीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शिंदे यांनी पुरात उडी मारून तीन तरुणांचे प्राण वाचविले. त्यांच्या या धाडसी कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रात्री साडेअकराच्या सुमारास मुसळधार पावसामुळे कौडगावहुडा गावाजवळील छोटा ओढा प्रचंड धोकादायक स्वरूपात वाहू लागला. या दरम्यान चारचाकी गाडी पुलावरून जात असताना पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेली. कारमधील तीन तरुणांनी प्रसंगावधान राखून गाडीतून उड्या मारल्या आणि पात्रातील झाडाचा आधार घेतला होता. याबाबत माहिती मिळताच अंबाजोगाईचे सहा. पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
झाडाला धरून जीवाच्या भीतीने थरथरणाऱ्या या तरुणांना पाहताच सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न करता पुराच्या पाण्यात उडी घेतली. पाण्याचा प्रचंड वेग आणि पूर्ण अंधार यामुळे बचावकार्य अशक्यप्राय वाटत होते. मात्र, धाडस आणि पोलिसी जिद्दीच्या जोरावर शिंदे यांनी पोहत जाऊन तीन तरुणांना सुरक्षित पाण्यातून ओढून आणत बाहेर काढले. याकामी शिंदे यांना त्यांचा अंगरक्षक पोलीस कर्मचारी केदारे यांनी मदत केली.
शिंदे यांच्या या कर्तृत्वाने घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांसह गावकरीही थक्क झाले. क्षणभराचा उशीर झाला असता तर काहीही विपरीत घडू शकले असते. शिंदे यांच्या धाडसामुळे तीन तरुण सुरक्षित परतले. अद्याप एक तरुण बेपत्ता असून त्याचा शोध प्रशासन घेत आहे.
धाडस, तत्परता आणि सेवाभाव यांचे अनोखे मिश्रण घडले ते म्हणजे आयपीएस अधिकारी ऋषिकेश शिंदे यांची ही कामगिरी. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, अंधारात आणि जोरदार पावसात जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यात उडी मारून जीव वाचविणाऱ्या या शूर अधिकाऱ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशा संकटाच्या वेळी दाखविलेला धाडस आणि जीव वाचविण्याचा पराक्रम हा पोलिसी सेवेच्या कार्यकर्तृत्वाचा जिवंत आदर्श ठरला आहे.