गेवराई : ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी आमदार विजयसिंह पंडित व आमदार प्रकाशराव सोळंके यांच्याविरोधात केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यामुळे गेवराई शहरात तणाव निर्माण झाला आहे. या वक्तव्याविरोधात रविवारी मराठा व ओबीसी समाजातील युवकांनी शहरात प्रा. हाके यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दंडुक्यांनी मारहाण करून तो जाळला. या प्रकारानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले.
सोमवारी प्रा. हाके यांनी “ज्या ठिकाणी माझा पुतळा जाळण्यात आला, त्याच ठिकाणी दुग्धाभिषेक करून चहा पिणार” असे जाहीर आव्हान विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांना दिले होते. नियोजित वेळेनुसार छत्रपती शिवाजी महाराज चौकात हाके समर्थक आणि विरोधकांची मोठी गर्दी जमली.
प्रा. हाके चौकात पोहोचताच जमावातून त्यांच्या ताफ्यावर अचानक दगडफेक व चप्पलफेक करण्यात आली. परिस्थिती चिघळू लागल्याने पोलिसांनी तातडीने लाठीचार्ज करून जमाव पांगवला. त्यानंतर पोलिसांनी हाके यांना सुरक्षितरीत्या शहराबाहेर हलवले.
या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या गेवराई शहरात वातावरण निवळले असून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.